पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हितगूज (भाग दुसरा)

गच्या लेखात माझ्या बालपणापासून व्यावसायिक जीवनाच्या सुरुवातीच्या काळातील वैशिष्टयपूूर्ण घडामोडी मी आपल्याला सांगितल्या. या लेखात व्यवस्थापकीय क्षेत्रातील माझ्या कामगिरीबद्दल आपल्याशी या थोड्याशा गप्पा.

 अमेरिकेत व्यवस्थापकीय शिक्षणाची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील तिसरा महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणता येईल. या अभ्यासासाठी मला ‘फुलब्राईट फेलोशिप' मिळाली. ही फेलोशिप मला कशी मिळाली याची कहाणी दिलचस्प आहे.
 मी अर्ज केल्यानंतर मला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलं होतं, पण या फेलोशिपसाठी व्यवस्थापनशास्त्रातील पदवी किंवा कोणत्याही क्षेत्रातील पदव्युुत्तर अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक होते. ती माझ्याजवळ नसल्याने मला मिळालेलं मुलाखतीचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याचंं मागाहून कळविण्यात आले. माझंं शिक्षण त्या वेळी बी.एस्सी. (टेक्नॉलॉजी) म्हणजेच सध्याच्या भाषेत बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग एवढंच होतं. बी.एस्सी. (टेक्नोलॉजी) ही पदवी बी.एस्सी.नंतरचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच मिळते. त्यामुळे मी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे असाच याचा अर्थ होतो असं मी त्यांना कळविलंं. मात्र त्यांनी मला मुंबई विद्यापीठाचं तसं प्रमाणपत्र ताबडतोब सादर करण्यास सांगितले.

 त्यावेळी माझंं भाग्य बलवत्तर असावं. कारण मी दुपारी दीड वाजता धावत पळत मुंबई विद्यापीठाच्या कार्यालयात गेलो. ती जेवणाची वेळ असूनही असिस्टंट सबरजिस्ट्रार यांच्या कार्यालयात गेलो होतो. त्यांनी माझंं म्हणणंं ऐकून घेऊन मला आवश्यक ते प्रमाणपत्र एका तासात दिलं मी ते लगेच ‘फुलब्रााईट'च्या अधिकाऱ्यांना सादर केलं व ठरल्या वेळी माझी मुलाखत घेण्याची मागणी केली. मात्र, आपल्याला येण्यास उशीर झाल्याने आपली जागा भरण्यात आली आहे, असं सांगून त्यांनी मुलाखत घेण्यास नकार दिला. आणखी कोणी उमेदवार अनुपस्थित राहिल्यास आपला विचार करण्यात येईल, आपण वाट पाहा असा दिलासा देण्यात आला. मी संध्याकाळी साडेपाचपर्यंत वाट पाहिली, पण कोणीही अनुपस्थित राहिला नाही!

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / ११९