पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३२

हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन शिक्षण : काल, आज व उद्या

टेबरोबर वाहून जाणं समाजाला आवडतं. कोणतंही नवं क्षेत्र समाजासाठी खुलं झालं आणि हे लक्षात आलं की, समाजातील बुध्दिवंतांपासून सामान्यांपर्यत सारे जण त्याकडेच धावायला सुरवात करतात. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही.

 सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी जेव्हा भारतात इंग्रजी शिक्षणाची व इंग्रजी शिक्षण पध्दतीची सुरुवात झाली, त्या वेळी शिक्षण घेण्याची इच्छा असणारे बहुतेक जण माध्यमिक शिक्षणानंतर ‘आर्टस्’ शाखा स्वीकारणं पसंत करीत असत. त्यातही अधिक बुध्दिमत्तेच्या विद्यार्थ्यांचा ओढा वकील होण्याकडे असे. त्यामुळे त्या काळात लेखक,कवी व कायदेतज्ज्ञ यांची रेलचेल होती. कारण, त्या शिक्षणाची लाट होती ती सुमारे पन्नास वर्षे टिकली.
 नंतर सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची पहाट उगवल्यानंतर बुध्दिमान विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षणाकडे वाढू लागला. कारण समाजाला त्या वेळी या क्षेत्रातील शिक्षितांची गरज निर्माण झाली होती. त्या नंतरच्या काळात वैद्यकीय शिक्षणाकडे समाजाचं लक्ष गेलं. ही लाट अजूनही टिकून आहे.

 याबरोबरच सध्या आणखी एक जोरदार लाट आली आहे,ती म्हणजे व्यवस्थापन शिक्षणाची. तांत्रिक शिक्षणाला जोड म्हणून प्रथम या शिक्षण क्षेत्राचा उदय झाला. नंतर ते कमालीचं लोकप्रिय झालं. इतकं की कोणत्याही फलाण्या विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पदवी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागू लागल्या. लग्नाच्या बाजारातही ‘व्यवस्थापन तज्ज्ञाां'चा भाव अन्य शिक्षितांपेक्षा अधिक झाला. पर्यायाने आज

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /१२३