पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

धन मिळवणं, नोकरांची क्रूरपणे पिळवणूक करणंं हे त्यांचंं ध्येय बनले. या ‘ध्येयपूर्तींत' त्यांना कारभाऱ्यांचं मोलाचं सहाय्य लाभू लागलं.
 बहुतेक कारभाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा व्यवस्थित उठवला. एकीकडे मालकांची चमचेगिरी करून त्यांच्याकडून फायदा करून घेणे तर दुसरीकडे मालकाचा धाक दाखवून नोकरांना पिळणंं असा त्यांचा दुहेरी खाक्या होता.`मालक म्हणजे देव! तुम्ही त्यांना काही विचारता कामा नये. त्यांना काही सांगता कामा नये. आम्ही कारभारी मालकांचे प्रतिनिधी आहोत. आमची आज्ञा म्हणजे मालकांचीच आज्ञा. तिचं तुम्ही मुकाट पालन केलं पाहिजे' असं नोकरांच्या मनावर बिंबविण्यात येऊ लागलं. आज्ञापालन न करणाऱ्या `चुकार` नोकरांना क्रूर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. (थोडक्यात, ‘मालिकके जूते मेरे सर पर, आणि मेरे जूते नौकरों के सर पर’ अशी कारभाऱ्यांची कार्यपध्दती असे.) या शिक्षेला घाबरून म्हणा किंवा पैशाच्या गरजेपोटी म्हणा, नोकरांनी कारभाऱ्यांची सत्ता निमूटपणे स्वीकारलीः मालकांबाबत त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली. महाभारतात म्हटलेच आहे, ‘अर्थस्य पुरुषो दासः` म्हणजे पुरुष संपत्तीचा दास असतो. पैशासाठी तो अपमानही गिळतो. हजारो वर्षे ही पध्दती वंशपरंपरागत व अव्याहतपणे सुरू होती, याचा दुष्परिणामही जो व्हायचा तों झालाच. ज्याने उद्योगाचा विकास करावयाचा तो मालकच चैनीत दंग असल्याने प्रगती खुंटली. आपला देश परकीय आक्रमणाला बळी पडण्यासही जमीनदार, राजे, वतनदार म्हणजे `मालक' यांची ही सरंजामी वृत्ती व कारभाऱ्यांचा स्वार्थ कारणीभूत आहे.
 ‘मालकांना विचारायचं कसं’ आणि `मालकांना सांगायचं कसं?’ या संस्कृतीचा जन्म हा असा झाला.
 सुमारे २०० वर्षांपूर्वी युरोपात औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर ती पुढील १०० वर्षात जगभर पसरली. केवळ शेती, पशुपालन व छोटे उद्योग यावर अवलंबून राहणाऱ्या जनतेला रोजगाराच्या नव्या संधी या औद्योगिक क्रांतीमुळे उपलब्ध झाल्या. संपत्ती निर्माण करण्याचे नवे स्रोत निर्माण झाले. यंत्रांच्या साह्याने तयार झालेल्या विविध वस्तूंचंं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं. नवी बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था निर्माण झाली. एकंदरीतच जगाचं आर्थिक जीवनमान उंचावलं.
 पूर्वीच्या काळी फक्त शेतीचे किंवा गुराढोरांचे मालक असत. औद्योगिक क्रांतीनंतरच्या नव्या जगात विविध व्यवसाय, कारखाने व कंपन्यांचा नवा मालकवर्ग तयार झाला.
 या नव्या काळातही उद्योगधंदे सांभाळण्यासाठी मालक, कारभारी व नोकर ही तीन पदरी मनुष्यबळ व्यवस्था पूर्वीप्रमाणेच कायम राहिली. इतकेच नव्हे तर या तिन्ही गटांची मानसिकता, कार्यपध्दती व परस्परांशी संबंधही कमी अधिक प्रमाणात तसेच

राहिले. फरक एवढाच झाला मालकाचा उद्योगपती झाला आणि नोकर या शब्दाऐवजी

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/११