पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा

 लग्न हे एकदाच करायचं आणि आयुष्यभर टिकवायचं असतं' असा संस्कार असतो. बहुतेक भारतीय व्यवथापकांचा नोकरीबाबतही हाच असतो. एकदा त्याला ती मिळाली की ती बदलण्याचा विचार तो क्वचितच करतो.

 काही दशकांपूर्वी हा विचार सुसंगत होता. त्यावेळी नवं आणि पहिल्यापेक्षा चांगलं काम मिळण्याची शक्यता कमी असायची. सारखी नोकरी बदलणाऱ्या उमेदवाराकडे कंपन्यांही संशयानं बघायच्या. नोकरी सोडणं म्हणजे कंपनीशी बेईमानी असं समजलं जायचं.

 आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. विद्यमान नोकरी चांगली असली तरी अनेक कारणांमुळं ती सोडणारे काही व्यवस्थापक अलीकडे दिसू लागलेत. तथापि बहुसंख्य भारतीय व्यवस्थापक नोकरी गृहीत धरतात आणि तिच्याकडे त्रयस्थपणे पाहण्याची त्यांची वृत्ती नसते. सध्याच्या काळात एकाच नोकरीमध्ये भावनात्मक रीतीनं गुंतून न राहता, हा त्रयस्थ दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक झालं आहे.

 आपली पत्नी किंवा पती मनाजोगता मिळाला नाही, म्हणून त्यात बदल करायचा हे आपल्याला पटत नाही. अगदीच गंभीर कारण घडल्याशिवाय घटस्फोटाचा विचारही केला जात नाही. कारण किरकोळ कारणांवरून लग्नं मोडल्यास संसार अस्थिर होतील आणि पर्यायाने समाज अस्थिर होईल ही भावना त्यामागं असते. लग्नाच्या बाबतीत हे ठीक आहे, पण नोकरीसंबंधी असा विचार केल्याने काही वेळा व्यवस्थापकाचं नुकसान होऊ शकते.

 कंपनीने कर्मचारी संख्या कमी करण्याचा निर्णय घेणं हे नोकरी सोडावी लागण्यामागचं कारण असतं. मात्र कामाबाबत समाधान न वाटणं. तसंच कामातून समाधान न मिळणं ही देखील नोकरी सोडण्याची कारणं होऊ शकतात. सध्याचा काळ विचित्र आहे. एकीकडं तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं नवे नवे उद्योग निर्माण होत आहेत. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. तर दुसरीकडं प्रस्थापित उद्योगांची कक्षा मंदीमुळे आकसत

नोकरीबाबत स्थितप्रज्ञ राहा /२०८