पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खपविण्याचे शिवधनुष्य व्यवस्थांना उचलावं लागत आहे.
 त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्याने परदेशांत तयार होणाऱ्या मालाला भारताचे दरवाजे मोकळे करून द्यावे लागत आहेत.W.T.O. कराराप्रमाणे आयातीवरचे निबंध हटवावे लागले आहेत. त्यामुळे भारतीय वस्तूंपेक्षा टिकाऊ, सुबक व स्वस्त परदेशी वस्तूंनी आपली बाजारपेठ भरून जात आहे. आईवडिलांनी केवळ भात-आमटी खाण्याची सवय लावलेल्या बालकाच्या हातात मोठा ‘कॅडबरीज'चा बार ठेवावा आणि त्याने त्यावर तुटून पडावं, तसं आपले ग्राहकही या आकर्षक वस्तूंवर उड्या मारताहेत.
 याचा परिणाम म्हणून देशी उद्योग खिळखिळे होत आहेत. अनेक तर बंदच पडले आहेत, पण त्यातील आधुनिक यंत्रांवर काम करण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे. पूर्वीच्या समाजवादी अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञान विकासाला प्राधान्य नसल्याने कुशल कामगारांची फौज तयार झाली नाही. अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांची संख्या जास्त आहे.(अपवाद फक्त माहिती तंत्रज्ञान, संगणक सॉफ्टवेअर क्षेत्राचा) या अकुशल व अर्धकुशल कामगारांना आता काम मिळणं मुश्किल झालं असून त्यांच्या बेकारीची सामाजिक व मानवीय (ह्यूमन) समस्या उभी राहत आहे आणि या परिस्थितीला या कामगारांना दोषी ठरवता येणार नाही. त्यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणं ही प्राथमिकता आहे. त्यांना वाच्यावर सोडता येणार नाही.
 अशा तऱ्हेने, परकीय बाजारपेठ काबीज करणं, देशांतर्गत बाजारपेठ राखणे, बेकारी आणि जागतिक मंदी हे चार आव्हानात्मक भस्मासुर एकाच वेळी भारतीय व्यवस्थापनासमोर उभे आहेत. यातल्या एकीकडे जरी दुर्लक्ष झालं तरी तो आपल्या डोक्यावर हात ठेवेल.डिसेंबर महिन्यात सकाळी सहा वाजता अंगावरचे कपडे काढून पोहायला येत नसलेल्या एखाद्या बालकाला पोहण्याच्या पुलात उतरवावं, म्हणजे त्याची जी अवस्था होईल तीच अवस्था आपल्या उद्योग क्षेत्राची झाली आहे.

 तथापि, माझ्या व्यवस्थापकीय मित्रांनो,घाबरून जाण्याचे कारण नाही.बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे आपण स्वतला फिरविण्याची तयारी दाखविली तर या सर्व भस्मासुरांना एकाच वेळी यमसदनी धाडणंं अशक्य नाही. यासाठी कोणते गुण विकसित करावे लागणार आहेत याची माहिती पुढील लेखात घेऊ.

आव्हान जागतिक स्पर्धेचे/४२