पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री

र्धेच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी व्यवस्थापकांना कोणत्या गुणांचा व तंत्रांचा विकास करावा लागेल, याबाबत आपण मागच्या लेखात काही मुद्यांचा परामर्ष घेतला. या लेखात उत्तम व्यवस्थापनाच्या आणखी काही पैलूंबाबत विचार

करणार आहोत.
एकरूपता किंवा समरसता :
 कोणत्याही संस्थेत काम करताना ती संस्था आपली आहे, या भावनेने कार्यरत राहणं आवश्यक आहे. एकरूपतेच्या भावनेइतका प्रभावी दुसरा प्रेरणास्त्रोत नाही. १९७७ मध्ये जनता राजवटीत टाटांच्या 'टिस्को’ या पोलाद कारखान्याचे राष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला सर्वात मोठा विरोध झाला तो टिस्कोच्याच कामगारांकडून! ‘आमच्या कंपनीचं आम्ही राष्ट्रीयीकरण करू देणार नाही', अशी गर्जना त्यांनी केली. टिस्कोच्या ७० हजार कामगारांचा कंपनीत एक टक्काही समभाग नव्हता, तरीही त्यांना राष्ट्रीयीकरण मान्य नव्हतं. परिणामी ते बारगळलं. यात ‘आमच्या ’ या शब्दाला खास महत्त्व आहे.
 ही समरसतेची भावना कशी निर्माण करता येईल हा प्रयत्न नवा नाही. त्यावरील उपायही नवा नाही. कोणत्याही धर्माचं उदाहरण पाहा. विभिन्न स्वभावांच्या व आवडीनिवडीच्या लोकांना आपण विवक्षित धर्माचे आहोत असं वाटतं कसं ही भावना निर्माण करण्याची युक्ती धर्मातच आहे. कोणतेही धार्मिक कार्य समूहाने करावे लागते. मुस्लिमांची प्रार्थना असो, चर्चमधील सेवा असोत किंवा हिंदूंच्या तीर्थयात्रा असोत, (नुकतीच संपलेली पंढरपूरची वारी, सध्या सुरू असेलली अमरनाथ यात्रा, व काही दिवसांनी सुरू होत असलेला कुंभमेळा ही उत्तम उदाहरणे आहेत.) त्यात समुदायाचा सहभाग धर्माने अनिवार्य बनवला आहे. अशा एकत्र काम करण्याने एकरूपतेची व समरसतेची भावना वर्धिष्णू होते. संस्था बळकट होते.

 औद्योगिक संस्थांमध्येही कर्मचाऱ्यांना एकत्र काम करण्याची सवय लावणं , त्यासाठी त्यांच्या कामाचं स्वरूप वेळापत्रक तशा पध्दतीचे बनवणं, ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, हे काम कौशल्याचं आहे.

उज्ज्वल भवितव्याची त्रिसूत्री/४८