पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

याबद्दल गलिच्छ अफवा पसरविण्यापर्यंत कनिष्ठांची मजल जाऊ शकते. अशा वेळी खंबीरपणे उभं राहणं व परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्यास वेळप्रसंगी स्वत:च्या अधिकाराचा कठोरपणे वापर करून संबंधितांना त्यांची जागा दाखवून देणं हा नेतृत्वगुण महिलेला दाखवावाच लागेल. त्याचप्रमाणे नेत्याला संस्थेच्या हितासाठी अनेकदा अलोकप्रिय निर्णय घ्यावे लागतात. महिलांनाही यातून सुटका नाही.
कामासाठी अधिक वेळ : नेतृत्व करण्याची कामाची वेळ ९ ते ५ अशी ठोकळेबाज असू शकत नाही. त्याचा शक्य तितका वेळ त्याने संस्थेसाठी द्यावा अशी अपेक्षा असते आणि येथेच महिलांची सर्वाधिक कुचंबणा होते कारण घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पुरुषांप्रमाणे पूर्णपणे दुसऱ्यावर ढकलता येत नाहीत. यात जसा परंपरेचा भाग आहे, तसा निसर्गाने स्त्रीवर जी जबाबदारी टाकली आहे तिचाही एक भाग आहे. एक वेळ महिला परंपरा झुगारून देऊ शकेल, पण नैसर्गिक जबाबदाऱ्यानुसार वेळापत्रकाची आखणी करणं मात्र कोणत्याही परिस्थितीत कार्यालयीन कामाकडे दुर्लक्ष न करणं हा नेतृत्वगुण खास करून महिलांना दाखवावा लागतो.
हितसंबंध जपण्यासाठी अपुरा वेळ : नेत्याला केवळ कार्यालयीन कामकाज पाहून चालत नाही तर संस्थेच्या प्रगतीसाठी संस्थेबाहेरच्या लोकांशीही संबंध जोडावे व जपावे लागतात पुरुष हे काम धडाडीनं करतो. कारण समाजात कोठेही व कुणाशीही मिसळण्यास त्याला भीती बाळगण्याचं कारण नसतं. महिलांबाबत असं होत नाही. यातूनही एखादी महिला धाडसाने असं करत असेल तर तिच्याबाबत समाजाचे गैरसमज होण्याची शक्यता असते आणि ते दडपण महिलेला जाणवत राहतं. तेव्हा महिला म्हणून स्वतःची प्रतिष्ठा जपणं, घरच्या जबाबदाच्या व कार्यालयीन काम यातून तिला असे संबंध जपण्यासाठी व संधी कमी मिळते.
कठोर धोरण स्वीकारणे : एखादा अलोकप्रिय पण हिताचा निर्णय संबंधितांच्या गळी उतरवणं हे कौशल्याचं काम आहे.याबाबत पारंपरिकपणे पुरुष नेता जास्त आक्रमक बनू शकतो. महिलांनाही नेता म्हणून व्हावयाचं असेल तर ही आक्रमकता अंगी बाणावी लागते.
परिणाम देण्याचे दडपण : कोणत्याही व्यवस्थापकाला तू काम काय व किती करतोस असे कुणी विचारीत नाही. तर कामातून काय साध्य झालं हे विचारले जाते व त्यावरून त्याच्या कार्यक्षमतेची मोजदाद होते. महिलांनाही असे ‘रिझल्ट'द्यावेच लागतात.

 या सर्व अडचणींवर मात करून कित्येक महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केलं आहे पुढील लेखात अशा काही उदाहरणांचा विचार करू.

महिला व्यवस्थापक/ ६८