पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उत्तर : खरं पाहता मुलांपेक्षा पतीच जास्त नाराज असण्याची शक्यता आहे. अशा वेळी पतीला समजावण्याचा प्रयत्न करा. पण पती अगदीच हट्टाला पेटला असेल तर तुम्हाला पती किंवा जॉब यापैकी एकाला ‘घटस्फोट’ द्यावा लागेल. असाच निर्णय घेण्याची वेळ आली तर लक्षात असू द्या की, चांगली कामे मिळणं दुर्मिळ असतं. चांगले पती डझनावारी मिळतील. (अर्थात हा सल्ला रॉबर्ट टाऊनसेंड याने पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून दिला आहे. भारतात नवऱ्यांपासून घटस्फोट घेण्याचा विचार इतक्या तडकाफडकी स्त्री करू शकणार नाही. अशा वेळी पतीला विश्वासात घेऊन. काम करणं कुटुंबासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देऊन त्याचे सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करावा. शक्यतो पती व काम दोन्ही सुरक्षित राहतील असं पाहण्याचा भारतीय महिलांचा कल असतो.)
 प्ररन : बरोबर चार वाजता सर्व कामं टाळून माझ्याबरोबर पार्टीला ये असा आदेश’ माझ्या पतीने दिला आहे पण मला, महत्वाचे काम असल्याने जाणं शक्य होणार नाही. पतीची आर्थिक प्राप्ती माझ्या पगारापेक्षा बरीच अधिक आहे माझा ‘जॉब’ त्याला केवळ वेळ घालवण्याचे साधन वाटतं, त्याला माझ्या कामाचे महत्त्वंं वाटत नाही. पण मला मात्र कामाबद्दल प्रेम वाटतं. अशा स्थितीत मी काय करावे?
 उत्तर : पार्टीला मुळीच जाऊ नका. तुमची आर्थिक प्राप्ती कमी असली तरी तुमचा स्वाभिमान कमी नाही, हे दर्शवून देणं तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने महत्वाचे आहे मात्र रात्री घरी आल्यावर पतीची गोड शब्दांत समजूत घाला. त्याच्या मोठेपणाची व उदार मनोवृत्तीची स्तुती करा. तुमचा पगार कमी आहे हे मान्य करूनही तुमचा जॉब तुमच्या प्रतिष्टेच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे आणि तुमच्या प्रतिष्ठेमुळे पतीचीही प्रतिष्ठा कशी वाढते हे जिव्हाकौशल्याने त्याला पटवून द्या. बहुतेक वेळा पतीची नाराजी दूर होते, असा अनुभव आहे(हा सल्ला भारतीय महिलांनाही पटण्यासारखा आहे.)

 वरील प्रश्नोत्तरं केवळ उच्चपदस्थ महिलांसाठी नाहीत तर नोकरी करणाच्या सामान्य महिलांसाठीही उपयुक्त आहेत. यावरून आपल्या लक्षात येईल की, महिला म्हणून यशस्वी होताना येणाच्या अडचणींचा बाऊ करून दडपणाखाली येण्यापेक्षा त्यावर युक्तीचा वापर फरून सोपे उपाय शोधण्याकडे लक्ष दिल्यास यशाच्या शिखराकडे आपली वाटचाल सुसह्य होऊ शकेल.आम्ही अभ्यासलेल्या अनेक क्षेत्रांत काम करनाऱ्या यशस्वी महिलांच्या यशाचे रहस्य अन्यायाविरुध्द लढण्याच्या मागपिक्षा अशा सरळ साध्या व्यवहारी युक्त्यांमध्ये दडलेले आहे. या दोन्ही लेखांचं सार इतकंच की, महिलांनी आपली प्राथमिकता आधी निश्चित केली पाहिजे व एकदा ती केल्यानंतर स्वीकारलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्याही सबबी किंवा तयारी न सांगता अथकपणे प्रयत्नशील असले पाहिजे.मग असं लक्षात येईल की, यशस्वी होण्यासाठी ‘पुरुष’ असणेच आवश्यक नाही.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /७१