पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. या संग्रहातील शेवटची ‘सावित्रीच्या गर्भात...' ही शीर्षककथेतील त्या मुलीचे आत्मवृत्त मात्र डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. सुंदर मुलगी म्हणजे बापाला धोंड असते. ज्या मुली नको असतात त्यांना 'नकोशी' हे नाव दिले जाते. हे आपल्या समाजाचे कोणते प्रगत लक्षण म्हणावयाचे? कोणती स्त्रीदक्षिण्याची भूमिका म्हणावयाची? अशा अनेक प्रश्नांनी हा संग्रह स्त्रीचित्रण करतो.
 समर्थ आविष्कारतंत्रासह 'लंगडा बाळकृष्ण', 'ऑपरेशन जिनोसाईट' व 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या, कथासंग्रहातील या कथा स्त्रीचित्रणाचे व्यापकविश्व उभारतात तसेच याच संग्रहातील परिशिष्टांचे तपशील एका भीषण सामाजिक समस्येचा दस्तऐवज ठरावेत इतके महत्त्वाचे आहेत. एका कृतिप्रवण अधिकाऱ्याने ज्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक ज्या पोटतिडिकेने केली आहे त्या सर्व प्रयत्नांचा आविष्कार म्हणजे या कथा होत. मराठी कथापरंपरेत वेगळ्या स्त्री चित्रणाचे आगळे परिमाण साधणारा हा कथासंग्रह आहे. तो घटत्या बालिका दराचे सुन्न चित्र रेखाटणारा आहे.

१०४ □ अन्वयार्थ