पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/118

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खेळाडूंच्या जीवनसंघर्षाचे मनोज्ञ चित्रण
सुनीलकुमार लवटे

 मराठी कथासाहित्यात आजवर जीवनाच्या विविध अंगांचा वेध घेण्यात आला आहे, परंतु क्रीडा नि क्रीडांगण त्यात अपवादानेच प्रतिबिंबित झालेले दिसते. मराठी कथा साहित्यातील ही पोकळी लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'नंबर वन' या आपल्या कथासंग्रहाद्वारे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील अनुभवामुळे अत्यंत यशस्वी झाला आहे. मराठी चोखंदळ वाचकांना लक्ष्मीकांत देशमुख हे नाव परिचित आहे. अफगाणच्या वर्तमान तालिबानी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' कादंबरी, साधना साप्ताहिकात सुरू असले 'प्रशासननामा' हे वैचारिक सदर, ललित लेख; याशिवाय त्यांच्या नावावर 'कथांजली', 'अंतरीच्या गूढगर्भी,' 'पाणी! पाणी!!', 'अग्निपथ' सारखे कथासंग्रह जमा आहेत. त्याचं लेखन शिळोप्याचा उद्योग असत नाही. आयुक्त, विशेष कार्यकारी अधिकारी, संचालक, जिल्हाधिकारी अशी पदं भूषवत असताना ते समाजाच्या सर्व स्तरांतील प्रश्न व लोक समजून घेतात. व प्रक्रियेत अनेक कथाबीजं त्यांच्या हाती लागतात. त्यांच्या मनोज्ञ कथा होतात. त्यामुळे कल्पनेपेक्षा वास्ताधारित लेखन हा त्यांचा पिंड होतो. त्यातून जन्मलेलं साहित्य नवं विश्व घेऊन उभं ठाकतं. ते वाचकांना नवं विश्व दाखवतं.
  'नंबर वन' नावाप्रमाणेच खेळाडूंमधील माणूसपणाचा शोध घेणारा, त्यातील संघर्ष व भावनाचं द्वंद्व चित्रित करणारा 'नंबर वन' (पहिला नि उत्कृष्ट अशा अर्थांनी!) कथासंग्रह आहे. हा 'थीम बेस्ड' असा कथासंग्रह असल्याने प्रयोग म्हणूनही मराठी कथाप्रांगणात त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. भारत देश 'क्रीडा महासत्ता' का होत नाही, हा लेखकाला पडलेला प्रश्न आपलं सामाजिक शल्य आहे. या शल्यपूर्तीच्या ध्यासाची निर्मिती 'नंबर वन' मधील कथा. 'पढेंगे, लिखेंगे तो राजा बनेंगे! खेलेंगे, कुदेंगे तो खाक होंगे!!' ही भारतीय मानसिकता दूर करायची; तर खेळ हा धर्म आहे, ती वृत्ती आहे, तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे,





अन्वयार्थ ११९