पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/134

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणतं. त्यातील अनेक पालक भविष्यात दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याचा विचार करत असतात. त्यांना गर्भाचं लिंग निदान करून न घेता मुलगा व मुलगीस जन्म देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या टप्प्यावर महत्त्वाचा ठरतो. विशेषत: पहिली मुलगी असणाऱ्या पालकांना असं करण्यास प्रवृत्त करणं अत्यंत निर्णायक असतं. खरं तर अशी जाणीव जागृती करणं, ही एक अत्यावश्यक सामूहिक कृती असते. स्त्रियांना कुटुंबात नातेवाईंकाकडून होणाऱ्या गर्भलिंग निदानाच्या आग्रहास बळी न पडण्यास, स्वत:चे मत मांडण्यास बळ देण्याची गरज असते.
  या मोहिमेअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील २२० अंगणवाडी व बालवाडी शिक्षिकांचं दोन दिवसीय शिबिर घेण्यात आलं. अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका व ग्रामीण भागातील घरोघरी संपर्क असणाऱ्या, गावात मान्यता असणाऱ्या स्त्रिया असतात. त्यांच्या शिबिरात या समस्येची सर्व अंगांनी मांडणी झाली. स्त्रीभ्रूण हत्येच्या सामाजिक कारणांची चर्चा झाली. कायद्याची ओळख करून देण्यात आली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरगामी भीषण सामाजिक परिणामांची चर्चा झाली. हरियाना व राजस्थानात लग्नासाठी होणारी वधू खरेदी, फसवणूक वा जबरदस्तीनं कुटुंबातील एकापेक्षा जास्त पुरुष सदस्यांसोबत राहाण्यास भाग पाडलं जाणं या सर्व क्लेशदायी घटना स्त्रीभ्रूण हत्येशी संबंधित असल्याची वस्तुस्थिती प्रथमच त्यांच्यासमोर आल्याचं त्यांनी सांगितलं. स्त्रियांची संख्या कमी झाल्यास समाजात त्यांची मागणी वाढेल व त्यांना महत्त्व येईल, असा समज काही सहभागी स्त्रियांनी व्यक्त केला. परंतु प्रत्यक्षात स्त्रियांवरील लैंगिक हिंसा वाढेल, त्यांच्यावरील बंधने वाढून त्या पुन्हा घराच्या आत बंदिस्त होतील, असं भयावह चित्र त्यांच्यासमोर आलं. त्या या एकूण समस्येबाबत गंभीर झाल्या. गावातील गर्भवती स्त्रियांची नोंद ठेवून त्यांना गर्भलिंग निदानापासून परावृत्त करण्याची, त्यांच्या प्रसूतीबाबत माहिती घेण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. हे मोठेच यश होते.

 एका बाजूला मुलगी नको असणारी कुटुंबं आणि दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित, पण निव्वळ पैशासाठी सोनोग्राफी करून स्त्रीगर्भ हत्या करणारे डॉक्टर अशी परिस्थिती समाजात आहे. कोल्हापूरातील अशा काही डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात सहभाग असणारा एक घटक म्हणजे वकील. पन्हाळा तालुक्यातील वकिलांची एक कार्यशाळा पन्हाळा येथे झाली. त्यात गर्भधारणा व प्रसूतीपूर्व लिंग निदान चाचणी व लिंगनिवड आधारित गर्भपात रोखण्यासाठी असलेला PCPNDT कायदा, त्यातील पळवाटा यांची चर्चा झाली. अखेरीस अनेक सहभागी तरुण वकिलांनी अशा प्रकरणांत दोषी डॉक्टरांच्या बाजूने वकिली न करण्याचा निर्धार केला.

अन्वयार्थ १३५