पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या व्यापक कृती माहिमेनंतरही लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची संख्या वाढून गर्भपातांची संख्या वाढत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत होतं. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रास काळिमा फासणाऱ्या अशा डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. तसेच महिला फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून लिंगनिदान व लिंगनिवडीवर आधारित गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना पकडण्याचे सत्र सुरू केले. परंतु त्यांच्यावरील कायदेशीर प्रक्रिया अतिशय त्रासदायक व किचकट होती. शासकीय इस्पितळातील सिव्हिल सर्जन, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी व पोलिस खाते यांच्यासोबत व्यवहार करणं कमालीचं त्रासदायक होतं. कार्यकर्त्यांना नैराश्य जाणवू लागलं.
 या पार्श्वभूमीवर २००९ साली कोल्हापूरात श्री. लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ज्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं स्त्रीगर्भ हत्या इतकी सहज व मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती, त्याच (माहिती) विज्ञान - तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी 'सेव्ह द बेबी गर्ल' हा उपक्रम आणि 'सायलेंट ऑब्झर्व्हर' हा प्रयोग सुरू केला. अनेक बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांवर धाडी टाकल्या. स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांना दोषी डॉक्टर पकडण्यात सहकार्य केलं. उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी जर सामाजिक समस्यांबाबत संवेदनशील असतील तर प्रगतीशील प्रवाहास मदत होते. दरम्यान हे शोध-तंत्रज्ञान विकसित झालं. इतर राज्यांत त्याची उपयुक्तता तपासून पाहाण्याचे प्रयत्न झाले. पण अद्यापही समाजातील स्त्रीगर्भ हत्या पूर्णपणे रोखण्यात यश मिळालेले नाही.
 श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या संवेदनेच्या आविष्कारासाठी कथालेखनाचा सृजनशील मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथा संग्रहाच्या माध्यमातून लेखकानं पती-पत्नी, अपत्याचा जन्म, मुले म्हणजे कुटुंब आणि बाहेरचे जग यांच्यातील नात्याचं संवेदनशीलपणे चित्रण केलं आहे. 'माधुरी व मधुबाला' या कथेतील सरिता आणि गणेशची कहाणी प्रतिनिधिक आहे. पहिल्या गर्भधारणेनंतर मातृत्वाच्या चाहुलीनं फुलणाऱ्या नवविवाहित स्त्रीचं उत्कट भावविश्व इथं मोठ्या प्रभावीपणे उमटलेलं दिसतं. पण गर्भपातानंतर स्वत:च्या शरीराचा एक हिस्सा असणाऱ्या गर्भाशी असणारी तिची जैविक नाळ तुटून ती सैरभैर होते. तिचं रिकामपण तिला उद्ध्वस्त करतं. त्याचवेळी पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या 'वंशाला दिवा हवा' या तत्त्वाचा बळी असणारा पती अपत्यजन्माचा नैसर्गिक आनंदही उपभोगू शकत नाही. शेवटी निराधार मुलीस दत्तक घेऊन आपल्या अपराधाचं प्रायश्चित्त करणारा पती एक योग्य पाऊल उचलतो. इथं 'माझ्या शरीरावर माझा हक्क' ही स्त्रीवादी घोषणा महत्त्वाची वाटते. मुलाला जन्म देण्याचा
१३६ अन्वयार्थ