पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कादंबरीचे लोकशाहीकरण

महेंद्र कदम

“कादंबरी आणि लोकशाही यांच्या संबंधांचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे व ती म्हणजे लोकशाही ही फक्त एक राजकीय व्यवस्था आणि शासनपद्धती नाही. तो सहिष्णुतेची संस्कृती, इतरांविषयी आदरभाव, एकमेकांतील अंतराचा स्वीकार, विचारांच्या अनेकतांचा आदर, आविष्कार स्वातंत्र्य, संवादाची तत्परता यांचा विकास करणारी मानसिकता आहे. लोकशाहीची ही वैशिष्ट्ये कादंबरीचा स्वभाव व तिची संरचना यात अनुस्यूत असतात. आणि तीही अशाच मानसिकतेची निर्मिती करते. ती व्यक्तीच्या स्वातंत्र्यासोबत समाजहितही लक्षात घेते, जो लोकशाहीचा अनिवार्य असा गुण आहे" - मॅनेजर पांडेय *

 लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘सलोमी' (१९९१), 'अंधेरनगरी' (१९९४), 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००२), 'ऑक्टोपस' (२००८), आणि 'हरवलेले बालपण' (२०१४) या पाच कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपली लेखकपणाची भूमिका मांडली आहे. या कादंबऱ्या साधारणपणे १९९१ नंतर म्हणजे जागतिकीकरण सुरू झाल्यानंतर प्रकाशित झाल्या आहेत. असे असले तरी त्यांची कादंबरी वेगळे भावविश्व घेऊन अवतरते. पाचही कादंबऱ्यांचे आशय भिन्न असले तरी 'सलोमी' या कादंबरीचा अपवाद वगळता चारही कादंबऱ्यांमध्ये राजकारण - म्हणजे शासन आणि प्रशासन हे दोन केंद्रबिंदू म्हणूनच येताना दिसतात. या शासन - प्रशासनाचा थेट संबंध लोकशाहीशी येत असल्यामुळे मॅनेजर पांडेयचे विधान आपण येथे नोंदवले आहे. मॅनेजर पांडेय कादंबरीचा लोकशाहीशी संबंध जोडून दाखवतात; तसा लक्ष्मीकांत देशमुखांच्या कादंबऱ्यांचा लोकशाही व्यवस्थेशी काही संबंध आहे का? तो आहे तर कोणत्या प्रकारचा आहे? या प्रश्नांचा शोध या ठिकाणी घ्यावयाचा आहे. अर्थात हे प्रश्न उपस्थित होण्याचे कारण त्यांच्या कादंबऱ्यांमधले

अन्वयार्थ □ १४१