पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/145

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरुद्ध जिहाद' या कादंबरीत झाली आहे. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, वगैरेंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तिरेखा सामान्यच वाटायला लागतात. मुळात त्या उंचीवर आणि अधिकारपदावर काम करणाऱ्या व्यक्तींचे सादरीकरण त्यांच्या पेशाला शोभेल असे जाणवत नाही. कादंबरीचा आशय अत्यंत उत्तम आहे; परंतु पात्रांच्या सामान्यीकरणामुळे आणि गर्दीमुळे पुन्हा याही कादंबरीची गुणवत्ता उणावत जाताना दिसते. _ 'ऑक्टोपस'मध्ये मोजक्याच आणि प्रभावी व्यक्तिरेखा आहेत. (याचा अर्थ असा नव्हे की, कादंबरीत अधिक व्यक्तिरेखा असू नयेत. असाव्यात पण त्या आशयाशी एकनिष्ठ होताना वाचकांच्या मन:पटलावरही आकार घेणाऱ्या असाव्यात.) कलेक्टर, मंडल अधिकारी आणि प्रशासनातील कर्मचारी यांच्याभोवती फिरणारी ही कादंबरी पात्रांचे नेमके तपशील नोंदवते. त्यांचे अंतर्बाह्य तपशील नेमकेपणाने आलेले आहेत. आनंद आणि भगवानची होणारी मानसिक कोंडी प्रभावीपणे नोंदली गेली आहे. प्रामाणिक भगवान मुलाच्या मानसिकतेपुढे आणि त्याच्या शिक्षणासाठी कसा स्खलनशील बनतो याचे जसे नेमके चित्रण आले आहे. तसेच स्वत:ची स्खलनशीलता वाचवण्यासाठी आनंद नोकरीचा राजीनामा देतो याचेही प्रभावी चित्रण आले आहे. या सगळ्या द्वंद्वात व्यक्तिरेखांची मानसिक अवस्था काय असते याचेही तपशील ही कादंबरी देते.
 'हरवलेले बालपण'मध्ये मात्र अनेक परिणामकारक बालव्यक्तिरेखा आल्या आहेत. अरुणदादापासून अनेक बालकामगार आपापल्या ओळखीसह कादंबरी उठून दिसतात. 'स्वप्नभूमी'ला साकार करणारे धाब्यावरील दोन बालकामगार जसे प्रभावी ठरतात तसे फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात मृत्यू पडलेला बालक असो किंवा जरीकामाच्या कारखान्यातील आजारपणामुळे मृत्यू पावलेला मुस्लीम बालक असो किंवा अरुणची बहीण असो; या सगळ्या व्यक्तिरेखा बालमजुरीचे विदारक वास्तव मांडण्यात यशस्वी झालेल्या आहेत. अरुण वयाने मोठा झाला तरी तो बालकांच्या प्रश्नांनी बाल राहतो, हे या व्यक्तिरेखेचे लक्षणीय यश आहे. तो आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळत नाही.

 भाषा आणि निवेदनाच्या अंगाने देशमुखांच्या कादंबऱ्यांचा विचार करताना त्यांचे एक वेगळेपण ठळकपणे लक्षात येते, ते म्हणजे त्यांची भाषेवर आणि सांस्कृतिक तपशिलावर असलेली पकड. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांच्या सामाजिक-सांस्कृतिक परंपरा, चालीरीती, वारसा त्यांना जसा नीटपणे माहीत आहे; तसाच भाषिक भानाचाही संदर्भ त्यांना नीट अवगत आहे. मुस्लीम धर्माचे, संदर्भाचे चित्रण करताना देशमुखांच्या निवेदानात मुस्लीम भाषेचे अनेक संदर्भ सहजपणे डोकावताना दिसतात. तीच भाषा जेव्हा प्रशासकीय निवेदन करू लागते तेव्हा कशी प्रमाण, इंग्लिशमिश्रित आणि प्रजासकीय भाषा बनते, हे पाहण्यासारखे

१४६ □ अन्वयार्थ