पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/15

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद ते नगरपालिका या जिल्हा प्रशासनातील राजकीय ताणांचे व डावपेचाचे चित्रण देशमुखांच्या कादंबरीत आहे. डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी राजकीय सत्यस्थितीचा आविष्कार 'अंधेरनगरी' या कादंबरीतून झाला असल्याचे सांगितले आहे. निवडणुकीच्या यशाचे उद्दिष्ट ठेवून चालविलेले निर्दय खेळ असे वास्तव या कादंबरीतून अधोरेखित झाल्याचे नमूद केले आहे. डॉक्युमेंटरी स्वरूपाच्या या कादंबरीत अधिकारलालसेची प्रेरणा मानवी जीवनात सतत कशी कार्यरत असते हे मांडले आहे.
  डॉ. अशोक चौसाळकर यांनी सत्ताकारण आणि समाजहित यांच्यातील द्वैत 'अंधेरनगरी' या कादंबरीचित्रणात शोधले आहे. वेगवेगळ्या जीवनातील अनुभवचित्रणाने साहित्याला कसदारपणा लाभतो, तसेच साहित्याची प्रसरणशीलताही वाढते. या परिप्रेक्ष्यात 'अंधेरनगरीचे' आकलन मांडले आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकारणाचे भेदक चित्रण या कादंबरीत आहे. या कादंबरीतील सत्तासंघर्षाचे स्वरूप लेखकाने चार पातळ्यांवर उभे केले आहे. या सत्तासंघर्षात सहभागी झालेल्या व्यक्ती व त्यांना प्राप्त झालेले आयाम या कादंबरीत आहेत. कादंबरीचित्रणातील तीन वर्षाच्या कार्यकाळातील अनेक बारकाव्यांनिशी सत्ताकारणाचा वेध घेतला आहे. कादंबरी चित्रणातील जीवघेणा सत्तासंघर्ष डॉ. चौसाळकर यांनी राज्यसंस्थेच्या अंगाने न्याहाळला आहे. त्यामुळे या प्रकारच्या आकलनाला नवी दृष्टी प्राप्त झाली आहे.
  'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही देशमुख यांच्या कादंबरीप्रकल्पातील महत्त्वाची कादंबरी. या महाकथनात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक पट मांडला आहे. अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षाचे वेधक असे चित्र या कादंबरीत आहे. पारंपरिकता आणि आधुनिकता, सरंजामी धर्मांधतेचे प्रभावी अवशेष आणि साम्यवादी पक्षांची व्यूहनीती यातील तणावाचे चित्रण या कादंबरीत आहे. कादंबरीतील अनोख्या जीवनचित्रणामुळे मराठी सांस्कृतिक जगताकडून तिला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रस्तुत ग्रंथात या कादंबरीवरील जवळपास नऊ लेखांचा समावेश केला आहे. या कादंबरीचे अनेकपदरी बहुमुखीत्व या अभ्यासकांनी मांडले आहे.

 ज्येष्ठ विचारवंत ग. प्र. प्रधान यांनी या कादंबरीकडे राजकीय इतिहासाचे चित्रण करणारी कादंबरी म्हणून पाहिले आहे. जवळपास अर्धशतकातील विशिष्ट भूप्रदेशातील राजकीय उत्पाताचे चित्रणस्वरूप मांडले आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी या कादंबरीतील संस्कृतिकसंघर्षाचे स्वरूप मोठ्या विचारपटलावर शोधले आहे. मराठी लेखक क्वचितच महाराष्ट्राबाहेरील भूप्रदेशाचे चित्रण करतो असे निरीक्षण नोंदवून 'इन्किलाब' मधील संस्कृतिसंघर्षाचे स्वरूप सांगितले आहे. या कादंबरीतील संघर्ष तिपेडी स्वरूपात त्यांनी शोधला आहे. पाश्चात्त्य संस्कृती आणि साम्यवादी संस्कृती ही एकाच पाश्चात्त्य

अन्वयार्थ □ १५