पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/21

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 'पाणी! पाणी!' (कथासंग्रह, १९९८), 'अग्निपथ' (कथासंग्रह, २०१०), 'नंबर वन' (कथासंग्रह, २००८), 'अंधेरनगरी' (कादंबरी, १९९४), 'ऑक्टोपस' (कादंबरी) आणि 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' (कादंबरी) ही लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्यसंपदा आहे. या साहित्यातून त्यांनी समकालीन जीवनातील वास्तवाचा धीट आणि भेदकपणे वेध घेतला आहे.

 'पाणी! पाणी!!' आणि 'नंबर वन' मधल्या सर्व कथा 'थीम बेस्ड' आहेत, हे त्यांचे एक खास वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. 'पाणी! पाणी!!' मध्ये पाणी हे मध्यवर्ती विषयसूत्र आहे. गोरगरिबांची पाण्याअभावी होणारी भयानक परवड आणि धनदांडग्यांनी केलेली पाण्याची लयलूट हे आजच्या ग्रामीण जीवनाचे अंगावर येणारे व शहारे आणणारे वास्तव आहे. शासकीय योजना, त्या राबवणाऱ्यांची मनोवृत्ती, हितसंबंधाचे राजकारण, गोरगरिबांच्या हाल-अपेष्टा, शोषण, धनदांडग्यांची मुजोर वृत्ती आणि एकूणच उजाड होत चाललेली खेडी - याचे भेदक दर्शन या संग्रहातल्या कथांतून घडवण्यात आले आहे. 'नंबर वन' या कथासंग्रहाचे मध्यवर्ती सूत्र क्रीडाविश्व हे आहे. खेळ-खेळाडू, त्यांच्यातील स्पर्धा, असूया, द्वेष, क्रीडाक्षेत्रातले राजकारण, खेळाडूंची यश मिळण्यासाठी आणि अच्युच्च पदावर पोहोचण्यासाठी चाललेली अखंड धडपड, खेळाडूंचे खासगी जीवन, खेळातले जय-पराजय, खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी इ. मधले रोमांचकारी अनुभव 'नंबर वन'मधल्या कथांतून आविष्कृत झाले आहेत.
 लोककल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या व्यवस्था आणि संस्था यांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, साध्य-साधनविवेकाला मूठमाती दिलेले अनैतिक राजकारण, समाजातील हासशीलता, मूल्यांची घसरण, व्यक्तिगत जीवनात आलेली हतबलता, अगतिकता, असहायता हे आजचे वास्तव आहे. आदर्शवादाला तर या वास्तवाने मूठमातीच दिली आहे. अशा विपरीत स्थितीतही आपण स्वीकारलेल्या भूमिकेशी प्रतारणा न करता, तडजोड न करता संघर्ष करणाऱ्यांचा जीवनकथा 'अग्निपथ'मध्ये वाचायला मिळतात. या संघर्षाचे मोल यशापयशाच्या तराजूने जोखायचे नसते. I think, I am right, I constitute the majority of one.' (थोरो) अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. किंमत देऊन 'आतला आवाज' ऐकणाऱ्या अशा व्यक्ती अल्पसंख्यच असणार; पण त्यांचे असणे, त्यांच्या कृती (आणि प्रसंगी त्यांना आलेले अपयशही) प्रेरक असतात; जीवनावरची श्रद्धा टिकवणाऱ्या असतात. एक लेखक या नात्याने श्री. लक्ष्मीकांत देशमुख अशांचे महत्त्व आणि माहात्म्य 'आग्निपथ' मधून अधोरेखित करतात.

 हेच आशयसूत्र लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'ऑक्टोपस' आणि 'अंधेरनगरी'

अन्वयार्थ □ २१