पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/210

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



सुसंस्कृत असा मध्यम किंवा उच्च मध्यमवर्ग आहे, हे लगेच लक्षात येत नाही. मराठ्यांचे पानिपत करणारा अहमदशाह अब्दाली हा तर अफगाणी राष्ट्रीयतेचे प्रेरणास्थान. हा टोळ्यांचा देश. खरे म्हणजे, काश्मीरप्रमाणे येथेही इस्लामच्या कडव्या अंधनिष्ठेचे प्राबल्य नव्हते.
 पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानच्या केमाल पाशापासून स्फूर्ती घेऊन सामाजिक व धार्मिक सुधारणा येथे प्रथम झाहीरशाहने सुरू केल्या. त्याला पदच्युत करणाऱ्या दाऊदखानने त्या पुढे नेल्या. त्यानंतर १९७७ ते १९९० - ९१ च्या साम्यवादी खल्क अथवा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ अफगाणिस्तानच्या राजवटीत तर येथे सामाजिक क्रांतीचे वारेच निर्माण झाले होते. पूर्वीही येथील स्त्रिया बुरख्याच्या बाबतीत कर्मठ नव्हत्या. या काळात स्त्रिया शिकू लागल्या. डॉक्टर, इंजिनिअर, मॅनजर, मंत्री बनू लागल्या. मध्यवर्गीय स्त्रिया आधुनिक वेषभूषा करू लागल्या. सन . १९८५ ते १९८९ हा नजीकच्या राजवटीचा कालखंड सुख - समृद्धी व शांततेचा मानला जातो. पण त्याच काळात अफगाणिस्तानात पीडीपीएच्या मदतीला आलेल्या सोव्हिएत सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानामार्फत अफगाणिस्तानातील कडव्या मूलतत्त्ववाद्यांना सर्व तहेची मदत द्यायला सुरुवात केली. त्याची परिणती कशात झाली, ते आज आपण बघतोच आहोत.
 या सर्व फेऱ्यातून जाताना अफगाणी अवामचे मोठे हाल झाले. (अमेरिकेने विध्वंसक बॉम्बहल्ले करून तालिबान राजवट उलथून टाकली, तरी अजून अफगाणी जनतेचे हाल संपलेले नाहीतच.) कधी विज्ञानाने भारलेला आधुनिकवाद, तर कधी मध्ययुगाकडे नेणारा धार्मिक मूलतत्त्ववाद यांच्या हादरविणाऱ्या आंदोलनातून समाज गेला. सत्तापालट, रक्तपात, कुटुंबाची ताटातूट, वैचारिक झगड्यांचे गोळागोळीमध्ये परिवर्तन.... ती प्रदीर्घ गुंतागुंतीची कहाणी देशमुख यांनी मानवी सहृदयतेने आणि सहनशीलतेने चितारली आहे. त्याला भव्य परिमाण आहे ते धर्मसत्ता विरुद्ध राजसत्ता, धार्मिक मूलतत्त्ववाद विरुद्ध धार्मिक सहिष्णुता व उदारमतवाद; मार्क्सवाद विरुद्ध इस्लाम आणि मार्क्सवाद विरुद्ध उदारमतवाद अशा सनातन वैचारिक संघर्षाचे.

 मोठी समाधानाची गोष्ट म्हणजे देशमुखांनी कादंबरीमध्ये या संघर्षावर निबंध किंवा प्रवचने लिहिली नसून कथावस्तूच्या वाटचालीतून व पात्रांच्या जीवनप्रवाहातूनच हे झगडे मांडून व उलगडून दाखविले आहेत. आणि पात्रे तरी किती? यामध्ये कोणी एक नायक आहे, असे म्हणता येणार नाही. जमीनदारी घराण्यांतील उदारमतवादी तरुण युवा नेता अन्वर पगमानी हा केंद्रस्थानी धरला, तर त्याच्यापेक्षा किती तरी अधिक रसरशीत, शक्तिमान पात्रे यात आहेत.

अन्वयार्थ □ २११