पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/211

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 अफगाणिस्तानातील दोन टोकाच्या विचारसरण्यांच्या झगड्याचा निरीक्षक म्हणूनही अन्वरला केंद्रस्थानी घेणे कादंबरीकाराला सोयीचे गेले असेल. अन्वरचे धर्मश्रद्ध परंतु मूलतत्त्ववादी नसलेले वडील, त्याचे आधुनिक काका, लष्करातील आधुनिक विचारांचा ज्येष्ठ बंधू, जमीनदारी पाहणारा आणि अफूच्या माध्यमातून मूलतत्त्ववादी तालिबानी चळवळीत शिरलेला मधला भाऊ.... त्याची आई, आजी, आत्या आदी स्त्रिया; त्याची रशियन पत्नी तान्या ऊर्फ तराना, अॅसिडचे डाग मांडीवर बाळगणारी सलमा, त्याची चुलत बहीण व वाग्दत्त वधू झैनब.... दूरच्या नात्यातील धर्माचे प्रकांड पंडित व खोल धर्मश्रद्ध करिमुल्ला - जे तालिबान्यांना सुरुवातीला मदत करतात खरे, पण अखेर त्यांच्या अतिरेकी वागणुकीने हतबल व विफल होतात.... अशी असंख्य काल्पनिक पात्रे देशमुख यांनी या बहुभीतीयुक्त संघर्षाच्या भोवऱ्यात सोडली आहत. त्यांना आधार आहे प्रत्यक्ष इतिहासाच्या पानांतील हाडामांसाच्या व्यक्तिरेखांचा. स्वत: झाहीरशाह, पहिला बंडखोर क्रांतिकारक दाऊदखान, साम्यवादी क्रांतीतील प्रसिद्ध त्रिमूर्ती - नूह महंमद तराकी, हाफिझुल्ला अमीन, बबरक करमाल आणि त्यांच्यानंतरच्या पराभवाचा मरणप्राय भार आपल्या बलिष्ठ खांद्यावर तोलणारा नजीब ..... तसेच धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचे नेते गुलबदीन हेकमतयार, नंतर ओसामाचा सहकारी आणि आध्यात्मिक नेत्याचे स्थान प्राप्त झालेला मुल्ला ओमर, मेवांडवाल, बुर्हानुद्दीन रब्बानी, दोस्तम......
 अशी बलिष्ठ ऐतिहासिक पात्रे आपापली ताकद घेऊन जेव्हा कादंबरीत उतरतात, तेव्हा देशमुख त्यांना भरकटू न देता आपल्या निवेदनाच्या अंतर्गत शिस्तीत बसवितात. कादंबरीतील स्त्रियाही तेवढ्याच उंच आणि देशाच्या राजकारणात स्वत:ला बेगुमानपणे झोकून देणाऱ्या. पात्रे अतिरकी मूलतत्त्ववादी असोत, की कर्मठ कम्युनिस्ट किंवा उदारमतवादी मध्यममार्गी; ती आपापल्या जागी आपल्या निष्ठा व मूल्ये सांभाळत घट्टपणे उभी आहेत. मूल्यनिष्ठांच्या अतिरेकी कठोरपणाने जेवढी विकृती येत असेल, तेवढीच.

 देशमुख हे काही नवखे लेखक नव्हते. 'अंधारयात्रा' ही त्यांची कादंबरी आणि 'उदक' हा कथासंग्रह रसिकांना परिचित आहे, तो त्यातील वातावरणाच्या व तपशिलांच्या अस्सलपणामुळे. तसे देशमुख हे मराठी भाषेचे फार मोठे जादूगार आहेत, असेही म्हणणे कठीण आहे. पण संघर्षांना टोक आणणाऱ्या प्रसंगांमध्ये त्यांची लेखणी ओजस्वी बनू शकते. प्रस्तुत कादंबरीत अशा पुष्कळ घटना आहेत. पुल-ए-चराखीच्या तुरुंगातील भयाण रात्र, पहिल्या क्रांतीच्या वेळी सुरक्षाप्रमुख गुलाम हैदर रसुली याची घालमेल आणि त्याने आपल्या जावयाला गद्दारी करण्याचा दिलेला सल्ला, आपला गुरू आणि प्रतिस्पर्धी तराकी याला ठार मारताना स्वत:च्या मुलीलाही ठार मारून तिच्या प्रेताशेजारी शोक करणारा आणि अखेर स्वत:च खड्डा

२१२ □ अन्वयार्थ