पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/222

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कादंबरीचं यश ठरतं.
 मात्र या भावनांचा कल्लोळ आदर्शवादी, पुरेसा रोमँटिक आणि बराचसा ख्रिस्ती संवेदनशीलतेच्या जवळ, म्हणजे उपरतीच्या अंगानं जाणारा आहे. प्रखर निष्ठा, अचल श्रद्धा जेव्हा जीवनसंहारक ठरतात, तेव्हा त्या तपासून बघणं आणि त्यांना सोडचिठ्ठी देणं, ही नुसती शक्यतासुद्धा व्यक्तींच्या आत्मज्ञानाची पावती असते. कादंबरीत भेटणारी बरीचशी पुरुषपात्रं आपला घोषित मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जाताना दिसतात. या सर्वांत डोळ्यांत भरणारं उदाहरण हे इस्लामिक स्कॉलर प्रो. करिमुल्ला यांचं आहे. इस्लामिक शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्या करिमुल्लांचा जिहादींना पुरेपूर आशीर्वाद असतो. त्यानंतर जिहादीचं क्रौर्य आणि त्यांची असहिष्णुता बघून त्यांना उपरती होते आणि ते सूफी तत्त्वज्ञानाला जवळ जाणाऱ्या, सर्वसमावेशक, सहनशील इस्लामाची तरफदारी करू लागतात.
 जे इस्लामिक नाहीत, ते नापाक आणि काफीर ठरवणाऱ्या एका धर्माध व्यक्तीचा हा अंतर्गत प्रवास अचंबित करणारा, म्हणूनच अविश्वसनीय वाटतो. हे घडतं; कारण तराकी, करमाल, अमीन, नजिबुल्ला किंवा मुल्ला ओमर या ऐतिहासिक पात्रांच्या तुलनेत करिमुल्ला हे काल्पनिक पात्र म्हणून कादंबरीत येतं. करिमुल्लांच्या हळहळू परिपक्व होत जाणाऱ्या जाणिवेत व संयत होत जाणाऱ्या स्वरात सामंजस्याचे प्रतिध्वनी ऐकू येतात; कट्टर भूमिका घेणाऱ्या एका पात्राच्या मनाचं हे परिवर्तन कादंबरीला शेवटी विशालतेचं परिमाण देतात. हे जरा आदर्शवादी वाटतं.
 जिहादचा नारा देणारा जिहादी मनात उपरतीची भावना बाळगत नसतो. आपल्याला कयामतीच्या दिवशी पूर्ण न्याय मिळणार आहे, ही त्याची धार्मिक श्रद्धा असते. ही जेव्हा कमी होते तेव्हाच उपरती होते. कडवेपणा हा प्रचलित इस्लामचा गुणधर्म आहे, उपरती किंवा पश्चात्ताप हा फार तर ख्रिस्ती गुण म्हणता येईल. (आठवा : बायबलमधली 'रिटर्न ऑफ द प्रॉडिंगल सन'ची कथा) हिंदूंना होणारी उपरती बहुधा संन्यासाच्या मार्गानेच व्यक्त होते. स्वत:च्या हरवलेल्या केंद्रात परतून जाणारी ही संवेदनशीलता म्हणूनच ख्रिस्ती ठरते. कादंबरीतील बऱ्याच वक्तींचा प्रवास हा 'रिटर्न ऑफ द प्रॉडिगल सन'च्या वळणाने जातो.
 मनाला कायम टोचणी देणारी कठोर श्रद्धा खरी, की श्रद्धेला मुरड घालणारी सर्वसमावेशक समजूत? हे द्वंद्व सामान्य माणसाच्या मनात वसत असलं, तरी सत्तेच्या खेळात जर या आंतरिक द्वंद्वाला प्राधान्य दिलं, तर ते सत्तेच्या खेळाशी सुसंगत ठरत नाही. कादंबरीत भेटणाऱ्या इन्किलाबी नेत्यांना, तसंच जिहादींना हे पुरेपूर कळलेलं आहे. राजकीय सत्तेची अपरिहार्यता त्यांना उमगली आहे. तुम्ही तुमची सद्सद्विवेक आणि सत्ता एकत्रपणे भोगूच शकत नाही. सद्सद्विवेकाला

अन्वयार्थ □ २२३

अन्वयार्थ □ २२३