पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/229

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परमेश्वराचा संपूर्ण व शुद्ध उपदेश आहे. मुस्लिम पंडित म्हणतात की, ज्यूंच्या, ख्रिश्चनांच्या काही चालीरीती इस्लामनं उचलल्या, ही भूमिकाच बरोबर नाही. खरी गोष्ट अशी की मोझेझ व येशू हे दोघेही इस्लामचाच प्रचार करीत होते. म्हणून ज्या बाबी समान आढळतात त्या सर्व बाबी परमेश्वराने जगताच्या प्रारंभापासून सांगितलेल्या इस्लामचाच भाग आहेत. त्या शुद्ध इस्लाममध्ये सापडतात." हे तरानाचं अखंड अस्खलित भाष्य ऐकून अन्वर थक्क होतो. आपल्या धर्मनिष्ठ वडिलांनाही हे जमणार नाही असे त्याला वाटते. तराना हे सर्व अभ्यासपूर्वक बोलते. या प्रतिपादनातून आपण इस्लामचा डोळसपणे स्वीकार करीत आहोत हे तिला दाखवायचे आहे. आणि अन्वरचा विश्वास संपादन करून तिला आपला कार्यभाग साधायचा आहे, हे ती अन्वरपासून लपवते. अन्वरवरचे तिचे प्रेम मात्र सच्चे आहे आणि ते शेवटपर्यंत ती टिकवते.

राजकीय विचार व चर्चा


 प्रस्तुत कादंबरीत राजकीय स्वरूपाची जी चर्चा येते ती मार्क्सवाद, समाजवाद आणि साम्यवाद या संकल्पनांच्या संदर्भात. अफगाणिस्तानातील तरुणांनी सुरू केलेली राजकीय व धर्मविषयक सुधारणांची चळवळ पी. डी. पी. ए या संघटनेच्या वतीने चालविली जाते. 'धर्म ही अफूची गोळी आहे.' ह्या कार्ल मार्क्सच्या विचाराने प्रभावित झालेल्या अन्वरला वाटते की, अवामच्या बेहतर जिंदगीसाठी समाज आणायचा आहे. त्यांना शिक्षण-आरोग्य सुविधा द्यायच्या आहेत. त्यांना त्यांच्या गुलामीची, हलाखीची जाणीव करून देत त्यांच्यात वर्गसंघर्षाची बीजं पेरायची आहेत, हेच तर आपल्या पक्षाचं इतिहासदत्त कार्य आहे व त्याचे आपण निष्ठावान सैनिक आहोत.” (पृष्ठ ९१) या त्याच्या चिंतनातून अन्वरचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते.

 अन्वर व अमीन तराकीला भेटून हेरतला परत येत असताना जी चर्चा करतात त्यातून अमीनचा आणि तराकी यांचा लष्करी क्रांतीचा विचार अन्वरला कळतो. अमीन म्हणतो, "नेमक्या याच (सरकारवर दबाव आणणे) थिंकिंग प्रोसेसमधून मीही गेलो आहे. या मार्गानी क्रांती घडवायला शतकं लागतील. शिवाय शिक्षणानं मन नवोन्मेषशाली बनतंच असं नाही! तुझे ते प्रोफेसर करीमुल्ला घे. एवढे विद्वान, पण पक्के धार्मिक, म्हणून आपल्या क्रांतीसाठी अडसर. खरंच, या धर्मांधतेच्या सीमेवर पोचलेल्या कट्टर इस्लामिक बांधवांमध्ये क्रांतीची बीजं रोवणं फार कठीण .... म्हणून मी आणि जनाब तराकी वेगळा मार्ग चोखाळत आहोत. लष्करी अधिकारी व विद्यार्थी त्यांच्यात क्रांतीचा स्फुल्लिंग पेटवला की त्यांच्या माध्यमातून

२३० □ अन्वयार्थ