पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/233

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर, इस्लामला किंवा कुराणला इस्लामिक राज्य असं काही अभिप्रेत नाही. त्यामुळे इस्लामशी फारशी सुसंगत नसलेली जिहादी चळवळ बहुसंख्य अवामला मंजूर नाही. झपाट्यानं जग बदलत असताना त्याच्या गतीशी जुळवून घेत देशाची प्रगती साधायची असेल तर आधुनिक विचार अर्थात भोगवाद, स्वच्छंदता टाळून आपण स्वीकारला पाहिजे. हे तथाकथित जिहादी मार्क्स व त्याचा मार्क्सवाद कम्युनिझम देव मानत नव्हता म्हणून परका, काफिर मानतात. पण त्या मार्क्सनं गरीब शोषितांच्या भाकरीचा विचार केला. लोकसंख्येचा अर्धा भाग जो आम्हा स्त्रियांचा आहे, त्यांचा समतेचा विचार केला, आणि कोणतं तत्त्व धर्मपंथाच्या नावानं मूठभरांना श्रीमंत करीत बहुसंख्यांना कंगाल करतं, दारिद्रयात खितपत ठेवतं, याचं विश्लेषण केले आहे. त्यामळे त्याचे काही विचार देशाच्या भवितव्याचा विचार करून स्वीकारून त्यांना देशी वळण देऊन त्या आधारे देश चालवला पाहिजे. म्हणून सर्व मुजाहिदीन बांधवांना आवाहन आहे की त्यांनी जिहादी जुनूनची मानसिकता त्यागून आधुनिक पुरोगामी विचारांची साथ द्यावी. व जगाच्या बरोबर राहावं! या विचारातून मी पुन्हा पी. डी. पी. ए. मध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आहे.' (पृ. ३३९)
 या जमिलाच्या आवाहनात इस्लाम व मार्क्सवाद यांच्या विचाराचं यथायोग्य भान दिसतं. असंच भान तिनं कम्युनिस्ट विचारसरणीच्या आपल्या सहकाऱ्यांना जे आवाहन केले आहे त्यातही दिसते. ती म्हणते, “मेरे अजीजो, आपण कितीही अफगाण जीवनात आधुनिक इहवादी मूल्यं रुजवायचा प्रयतन करीत असलो तरी हा देश मूलत: इस्लामी देश आहे व अवामला इस्लाम सोडून कोणतीही प्रगती फारशी पसंद नाही. या पार्श्वभूमीवर आपण व पी. डी. पी. ए. ला अवामनं का स्वीकारलं नाही, हे लक्षात घ्या..... ज्यांच्यासाठी आपल्याला सारं काही करायचं आहे त्यांच्यापासून अलग राहून कसं करता येईल?" (पृ. ३४३)

 जमिलाच्या या विवेचनात तिचे समतोल वृत्तीचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. परंतु याच जमिलासारख्या स्त्रीला इस्लामी कायद्यान्वये दगडाने ठेचून मारले जाते हे पाहून मन उद्ध्वस्त होते. निडर स्वभावाची जामिला आपला मृत्यू अटळ असल्याचे पाहून न डगमगता काझीला आपले मनोगत व्यक्त करते, त्यातून ती सर्व स्त्री जातीचीच प्रतिनिधी आहे असे वाटते. ती म्हणते, "..... मला हा गुन्हा कबूल नाही, तशीच ही शिक्षाही मान्य नाही. काझीसाब, मध्ययुगीन काळातल्या या शिक्षा - देहदंड सरेआम देणं, हात-पाय तोडणं आज जगातील कोणत्याच मुस्लीम देशात लागू नाहीत.... मध्ययुगीन काळाचे कायदे व शिक्षा आजच्या नव्या दुनियेत पुन्हा लागू करून आपला देश आणखी पाच-दहा शतकं मागे नेणार आहोत? नाही

२३४ □ अन्वयार्थ