पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/237

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कसोट्यांवर पुरेपूर उतरले आहेत. या ठिकाणी डेबोरा एलीस या कॅनडातील ख्यातनाम लेखिकेने लिहिलेल्या 'द ब्रेडविनर' या कादंबरीचा उल्लेखही अपरिहार्य आहे. अर्थात ही कथा आहे ‘परवाना' नामक एका अफगाण मुलीच्या अतुलनीय धाडसाची, तालिबानी राजवटीचा अमानुष चेहरा उघडा करणारी, युद्धात बेचिराख होणाऱ्या शहरांची, होरपळणाऱ्या स्त्रिया, मुले आणि माणसांची. 'द ब्रेडविनर' आणि 'इन्किलाब' दोनही कादंबऱ्यांत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे, राखेतून हाडे शोधणाऱ्या माणसांचे आणि रक्तमांसाचे, चिखलातही शिल्लक राहिलेल्या माणुसकीचे अनुभव देणारे सारखेच प्रसंग आहेत. परंतु डेबोरा यांनी अफगाण निर्वासितांत दीर्घकाळ काम केलं होतं, या सर्वाचा थरारक अनुभव जवळून घेतला होता, हे लक्षात घ्यायला हवं.
 देशमुखांनी अफगाणिस्तानला प्रत्यक्ष भेट दिलेली नाही हे कळल्यावर एक प्रश्न मात्र माझ्या मनाला सारखा सतावू लागला की मग अफगाणिस्तानच का? प्रत्यक्ष अफगाणिस्तानात वास्तव्य करण्याची संधी मिळालेल्या साहित्यिकाला तिथल्या पाश्र्वभूमीवर लेखन करावंसं वाटणं हे स्वाभाविक ठरलं असतं. देशमुखांच्या एवढ्या प्रदीर्घ लेखनप्रपंचाची प्रेरणा काय असावी? कारण ही कादंबरी म्हणजे नुसत्या मानवी नातेसंबंधांची कहाणी नाही, वा एखादी प्रेमकथा नाही, किंवा नुसती सामाजिक वा राजकीय कथा नाही. ही कादंबरी म्हणजे अफगाणिस्तानच्या गेल्या अर्धशतकाच्या धगधगत्या राजकीय वाटचालीची, दोन राजकीय विचार-प्रणालींच्या रक्तरंजित संघर्षाची आणि यात भरडल्या गेलेल्या अफगाणी अवामची कहाणी आहे. जागतिक महासत्तांच्या शीतयुद्धात निघृणपणे एखाद्या प्याद्याप्रमाणे बळी गेलेल्या एका अभागी देशाची ही कहाणी आहे. या साऱ्याला पाश्चात्त्य संस्कृती आणि इस्लाम यांच्यातील सॅम्युएल हंटिंग्टनच्या 'संस्कृती संघर्षाच्या सिद्धान्ताची ही पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबर धार्मिक मूलतत्त्ववाद आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या उगमाचा मागोवा घेण्याचाही हा एक प्रयत्न आहे. या साऱ्या संदर्भाचा संबंध आपल्या देशात धर्माच्या जोरावर राजकीय सत्ता बळकावण्याच्या प्रयत्न करण्याऱ्या 'भगव्या तालिबान्यांशी'ही आहे आणि म्हणूनच 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही कोण्या एका देशाची कहाणी न राहाता एक जगतिक संदर्भ बनून येते.

 ही संपूर्ण कादंबरी ऐतिहासिक सत्य अणि कल्पनाविलास यांचं बेमिसाल मिश्रण आहे. अफगाणिस्तानच्या इतिहासातील अनेक वास्तव व्यक्तिरेखांच्या बरोबर अनेक काल्पनिक व्यक्तिरेखाही कांदबरीमध्ये इतक्या सहजपणे आणि कथानकाचा अविभाज्य भाग बनून वावरतात की वास्तवापासून कल्पना वेगळी करणे जाणकारालाही

२३८ □ अन्वयार्थ