पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/241

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज आपल्या देशासाठीही महत्त्वाचा ठरतो. मानवी इतिहासात धर्माची निर्मिती हा माणसच्या वैचारिक उत्क्रांतीचा एक टप्पा होता. धर्मानं विषमतेविरुद्ध कधी दंड थोपटले नाहीत. धर्म नाकारून समतेचा आग्रह धरणारा मार्क्सवाद हा वैचारिक उत्क्रांतीचा पुढचा क्रांतिकारक टप्पा होता. परंतु समतेचं गीत गाणारा मार्क्सवाद अतिरेकी साम्यवाद आणि हुकूमशाहीच्या वाटेवर जाऊन विरोधकांना चिरडण्याची भाषा करायला लागल्यावर लोकांना पुन्हा धर्माचा आश्रय घ्यावासा वाटू शकतो. परंतु धर्माधिष्ठित राजसत्ता आणि ती राबवणारे अशा हुकूमशहांपेक्षाही अधिक क्रूर ठरतात हेही इतिहासानं दाखवून दिलं आहे. आपल्या देशातही नरेंद्र मोदीनं घडवलेला नरसंहार आणि तोगडियांची बेलगाम भाषा याचीच आठवण करून देतात. प्रश्न अफगाणिस्तानच्या ह्या फरफटीतून आपण आत्मपरीक्षण करून काही शिकणार आहोत की नाही, एवढाच आहे आणि यासाठी लोकशाही आणि समतेवर विश्वास असणाऱ्या आणि नसणाऱ्यांनीही 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' आवर्जून वाचायला हवं.

२४२ □ अन्वयार्थ