पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/262

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवस्थेतील प्रशासनावर दबाव टाकणारा अरुण, तर समाजातील विविध घटकांना आपलेसे करून स्वत:चे नैतिक बळ उभारणारा अरुण. ही व्यक्तिरेखा लेखक अक्षरश: जगलेला आहे. त्यासाठी लागणारा ध्यास व तळमळ ही लेखक देशमुख यांच्या ठायी ओतप्रोत असल्याशिवाय असे चित्रण लिहिणे शक्य नाही, हे नोंदवणे आवश्यक आहे.
 कादंबरीतील शेवटचे कथानक म्हणजे बिहारमधून रोजगार मिळवून देतो म्हणून महाराष्ट्रात जरीकामाच्या कारखान्यात आणून डांबून ठेवलेल्या मुलांची यशस्वी सुटका. रोज सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत सतत काम करणारी मुले. त्यांना सतत अर्धपोटी ठेवून वर सतत मारहाण केली जात असे. अठरातास काम करताना हात थकायचे, डोळे दुखू लागायचे. वाकून काम केल्याने पाठ दुखायची. सुया टोचून बोटं रक्ताळायची. चुकारपणा झाला तर जेवण मिळायचे नाही. शिवाय भयंकर मारहाण.
 या भीषण जाचातून चांगल्या पोलीस अधिकाऱ्याच्या साहाय्याने अरुण सव्वाशे बालमजुरांची मुक्तता करतो. इतकेच नव्हे तर त्या बालकांना स्वत: घेऊन ट्रेनने बिहारला जातो. परंतु गावात पोहोचल्यावर त्याच्या लक्षात येते की गावातील ज्येष्ठांची मानसिकता बालमजुरीला अनुकूलच असते. गावाचा मुखिया चाँद अरुणला सुनावतो, 'वो काम नहीं करेंगे, तो भूखे मरेंगे! वो सब गरीब है! काम करना उनकी मजबूरी है। आप उनके मुँह का निवाला छीनते हो।"
 प्रत्यक्षात चाँद मुखिया व जमीनदार वर्ग हे मुंबईतल्या कारखानदारांसाठी दलाल म्हणून काम करीत असतात. लग्न, आजारपण, मर्तिक यासाठी गरिबांना व्याजावर पैसे देऊन थकलेल्या कर्जापोटी मुलांना सक्तीने महाराष्ट्रात कामाला पाठवीत असतात. परंतु याही वेळी बिहारमधील कलेक्टर पियूष शर्मा याला अरुणचा राग येतो व या प्रकरणात 'बिहार' बदनाम होत आहे असे त्याला वाटते.
 संपूर्ण कादंबरीचे कथानक सांगणे हा या लेखनाचा उद्देश खचितच नाही. असंख्य संकटे व अडचणी, बदनामीचे आरोप इत्यादीशी अरुण तत्त्वनिष्ठेने लढा अखेरपर्यंत चालूच ठेवतो. वेगवान व घडामोडींनी भरलेल्या या कथानकाचे प्रवाही व संवादपूर्ण सादरीकरण लेखकाने शैलीदार पद्धतीने केलेले आहे. यातील बालकामगार असलेली पात्रे सुबन्या, अफजल, बच्चू, कचऱ्या, लुळ्या इत्यादी मुलेमुली तसेच हिंदू-मुस्लीम दोन्ही समुदायांतील चांगल्या व वाईट व्यक्तींचे चित्रण लेखक पारदर्शी पद्धतीने करतो. कादंबरी जात-धर्म-लिंगभावाच्या पलीकडे घेऊन वाचकाला गुंगवून टाकते, अस्वस्थ करते व समस्येची दाहकता वाचकाच्या हृदयात पेटवत ठेवते.

 कादंबरीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सामाजिक, राजकीय, परिस्थिती, बाबरी

अन्वयार्थ □ २६३