पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/266

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रशासनाचे चित्तवेधक विश्लेषण



डॉ. प्रकाश पवार

 'प्रशासननामा' आणि 'बखर भारतीय प्रशासनाची' अशी दोन पुस्तके लक्ष्मीकांत देशमुखांनी लिहिली आहेत. याखेरीज त्यांनी अन्य पुस्तकेदेखील लिहिली आहेत. इथे वरती नोंदविलेल्या दोन पुस्तकांच्या संदर्भात परिचर्चा केली आहे. विकासलक्षी प्रशासन आणि खाजगी-सार्वजनिक प्रशासन या चौकटीमध्ये प्रशासनांच्या संकल्पनेची चिकित्सा त्यांनी केली आहे.

यक्षप्रश्नाची परिचर्चा


 लक्ष्मीकांत देशमुखांचा प्रशासनविषय दृष्टिकोन विकास प्रशासन आणि नव्वदीच्या दशकानंतर खाजगी-सार्वजनिक प्रशासनाच्या चौकटीमध्ये विकसित झालेला दिसतो. लोकप्रशासन हे शास्त्र असण्याबरोबर ती एक कला आहे, या मुद्द्यांचे सखोल आणि व्यापक आत्मभान त्यांच्या या दोन्ही पुस्तकांमध्ये सुस्पष्टपणे दिसते. कला या शब्दामध्ये व्यवहार कौशल्य हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. या कलेचा संबंध मानवी व्यवहाराशी येतो. त्यामुळे लोकप्रशासन हे सकारात्मक अर्थाने लोकांच्या इच्छा, अपेक्षा व आकांक्षा यांच्याशी संबंधित आहे. लोकांच्या जीवनाचा स्तर उंचविण्यामध्ये या कलेची भूमिका महत्त्वाची होती, आणि आहे. त्यातून लोकांच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान येते (happiness) हा मानवी जीवनाचा मध्यवर्ती आशय आहे. परंतु या गोष्टी प्रशासन करते तेव्हा समाजाचा त्या प्रशासकीय प्रक्रियेला प्रतिसाद सकारात्मक मिळत नाही- हा सर्वात मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्या प्रश्नाची परिचर्चा लक्ष्मीकांत देशमुखांनी अनुभवजन्य पद्धतीने सुरू केली आहे, हे प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचे नेत्रदीपक योगदान आहे. लोकांना व्यक्तिगत हित अपेक्षित असते आणि प्रशासनाला सार्वजनिक हित अपेक्षित असते. मथितार्थ, व्यक्तिगत आनंद, सुख, समाधान, संपत्ती, प्रतिष्ठा यांच्या सीमारेषा प्रशासनाला ओलांडाव्या लागतात. प्रशासनाचा अर्थ सार्वजनिक विवेक असा होतो.

अन्वयार्थ □ २६७