पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/268

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतीयीकरणावर धर्म या घटकांचा खोलवर प्रभाव पडला आहे. हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादविषय प्रशासनाचे भारतीयीकरण करतात. दोन, प्रशासनाच्या भारतीयकरणाचा दुसरा अर्थ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय अभिजन यांच्यामधील वाद-विवादाच्या क्षेत्रामध्ये आहे. राज्यघटना किंवा कायदा आणि जनतेचा प्रतिनिधी यांच्यामधील वाद हा मुख्य समस्याप्रधान विषय झाला आहे, या मुद्द्याची सखोल परिचर्चा त्यांनी केली आहे. तीन, राज्यघटना किंवा कायदा विवेकी आहे. कायद्याच्या राज्याचा व्यवहार प्रशासन करते, या अर्थाने प्रशासन विवेकी आहे. यामध्ये अविवेकी घटकांचा हस्तक्षेप वाढतो. म्हणजेच अविवेकीकरण हा घटक प्रशासनाला वेस्ट मिन्स्टर प्रारूपापासून वेगळा करतो. चार, भारतीय रुढीवादी समाजाशी जुळवून घेतो. हे चार प्रशासनाच्या भारतीयीकरणाचे सूत्र म्हणून नोंदविता येईल. त्या संदर्भातील अनेक पुरावे लक्ष्मीकांत देशमुख नोंदवितात.

अभ्यास पद्धती


 लक्ष्मीकांत देशमुखांनी त्यांच्या साहित्यांची वाचनीयता आणि रोचकता वाढविण्यासाठी त्यांनी 'बखर' साहित्यप्रकारामध्ये सादरीकरण केले आहे. या प्रकारामध्ये देखील संशोधन साहित्य हे अभ्यास पद्धतीवर आधारलेले असते, या बाजूकडे लक्ष्मीकांत देशमुखांनी पुरेसे लक्ष दिलेले दिसते. भारतीय प्रशासन व्यवस्था समजून घेणे आणि समजून देण्याची लक्ष्मीकांत देशमुखांची पद्धती मोठी रोचक आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे मुद्दा मांडला आहे. अभ्यासपद्धतीच्या आधारे देशमुख सर्वसामान्यीकरण करतात. म्हणजेच नियमाचे विवेचन करतात. मुद्यांचे नियमांमध्ये रूपांतर करताना त्यांनी प्रत्येक प्रकरणात लेखकांच्या पुस्तकाचा अभ्यासपूर्ण पुरावा सादर केला आहे. एव्हाना सर्वसामान्यीकरण करताना वैचारिक, संकल्पनात्मक आणि अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या पुराव्यांचे सादरीकरण हीच एक मोठी वैचारिक, घड़ामोड पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दिसते. त्यामुळे अध्ययन पद्धतीने ज्ञानाचे सादरीकरण, असे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट दिसते. भारतीय प्रशासनव्यवस्था विश्लेषणात त्यांनी वैचारिक संकल्पना आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाच्याखेरीज अनुभवजन्य पुरावे सादर केले आहेत. या पद्धतीने विषयाची मांडणी करताना त्यांनी नोकरशाही व्यवस्थेचे विश्लेषण केलेले आहे. त्यांच्या या पुस्तकांमध्ये नोकरशाही व्यवस्था या अर्थाने मांडलेली संकल्पना आहे. एकमेकांवरती प्रक्रिया करणाऱ्या घटकांचा संच अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. त्यांनी नोकरशाहीचे पर्यावरण मांडले आहे.

अन्वयार्थ □ २६९