पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/273

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रशासननामा


(लोकप्रतिनिधी व प्रशासकिय अधिकाऱ्यांसाठी उद्बोधक चिंतननामा)



प्रभाकर करंदीकर


 'प्रशासननामा' चे लेखक लक्ष्मीकांत देशमुख हे भारतीय प्रशासन सेवेतील माझे सहकारी. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे आणि माझा अनुभवही तसाच आहे. 'इन्किलाब आणि जिहाद' किंवा 'अंधेरी नगरी' या त्यांच्या साहित्यकृतींचे वाचकांनी चांगले स्वागत केले याचे मला विशेष समाधान वाटते. कारण त्यांचे विषय हटके आहेत. अलंकारांची जड वजने पेलण्याचा अट्टाहास न करता, साध्या परंतु ओघवत्या भाषेतील त्यांचे लिखाण थेट वाचकांच्या हृदयास भिडते. ललित साहित्याप्रमाणेच वृत्तपत्रीय स्तंभलेखनही त्यांनी केले आहे, हे मला माहीत नव्हते. 'प्रशासननामा' हे त्यांचे सदर टोपणनावाने त्यांनी चालवले. आता हे सर्व लेख प्रस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहेत हे त्यांनी मला सांगितल्यावर मी चकित झालो; पण या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहावी असा स्नेहपूर्ण आग्रह त्यांनी धरला, तेव्हा माझी खऱ्या अर्थाने विकेट पडली! मी यापूर्वी कधीही, कोणत्याही पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली नाही. त्यामुळे हे काम माझे नाही अशीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. तथापि, ‘ह्या पुस्तकाचा विषयच असा आहे की, याची प्रस्तावना प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या व्यक्तीनेच लिहायला हवी' हा आपला मुद्दा त्यांनी नेटाने लावून धरला. त्यामुळे शेवटी नाईलाजाने मला न पेलवणारी ही जबाबदारी मी स्वीकारली आहे.

 ह्या पुस्तकात समाविष्ट होणारे लेख मी एकसंधपणे वाचले, तेव्हा एखाद्या कादंबरीची प्रकरणे आपण वाचत आहोत की काय, असा भास झाला. काही प्रकरणे मी दोन-तीनदा वाचली, इतकी ती सुंदर आहेत. वाचकांनी उत्स्फूर्तपणे नोंदविलेल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला वाटून गेले की, 'ह्या पुस्तकाला वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही. वाचकांच्या प्रतिक्रियाच प्रस्तावना म्हणून छापाव्यात, ते अधिक संयुक्तिक ठरेल.' अर्थात, माझी ही सूचना लेखकाने स्वीकारली नाही, हे वेगळे

२७४ □ अन्वयार्थ