पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/302

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
समकालीन वास्तव कलात्मकतेनं टिपणार'जागल्या'
लेखक

मुलाखतकार : प्रा. रूपाली शिंदे व विनोद शिरसाठ


प्रा. रूपाली शिंदे :
 सर्वप्रथम मी व विनोद शिरसाठ तुमचे ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करून मुलाखतीला आरंभ करू या. पहिला प्रश्न हा की, ललित लेखन व एकूणच साहित्याकडे पहाण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? तुम्ही याबाबत सविस्तर बोलावेसे वाटते.
लक्ष्मीकांत देशमुख :
 तसं तर मी शालेय वयापासून लेखन करीत आहे. माझी लेखनाची सुरुवातच मुळी 'साधना' दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या एका बालकथेनं झाली. मग कॉलेजमध्ये प्रौढ कथालेखन सुरू केलं. पण त्यात सातत्य नव्हतं. पण साधारणपणे १९८० पासून बऱ्यापैकी सातत्य माझ्या लेखनात आहे. १९८२ ला पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला, तेव्हापासून माझे सहा कथासंग्रह, सहा कादंबऱ्या व इतर ललितेतर स्वरूपाची तीन पुस्तके असे माझे आजवरचे लेखनसाहित्य आहे. त्यामुळे या तीन दशकात लेखन करताना समविचारी लेखकमित्रांशी चर्चा, वादविवाद करताना व इतरांचे साहित्य-समीक्षा वाचताना माझे काही एक चिंतन साहित्याबाबत निश्चितच झाले आहे.
 त्यामुळे आज ललित लेखन व साहित्याकडे मी एकूणच कसा बघतो हे प्रथमदर्शनी सांगायचं झालं तर एक आंतरिक ऊर्मी आणि व्यक्त होण्याची आत्यंतिक निकड ही माझ्या लेखनाची मूलभूत प्रेरणा आहे. तशी ती हरेक लेखकाची असते. पण त्या मार्गाकडे जाऊन मी काही सांगणार आहे.

 मी मूलत: ललित लेखक आहे. कथा, कादंबरी व ललितलेखन हे माझ्या अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम आहे. मी ज्या प्रकारचे लेखन केले आहे व जे विषय हाताळले आहेत त्या अनुषंगाने मी जर माझ्या साहित्याकडे पाहिले तर आपल्या

अन्वयार्थ □ ३०३