पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/322

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिरेखांना देवत्वाच्या सीमेपर्यंत नेते, एकपत्नीव्रत, पित्याची (चुकीची असली तरी) आज्ञा पाळणे, बंधधर्म (भरत-लक्ष्मण) आणि सेवाभाव (हनुमान) सांगते. हे आदर्श आहेत. ते मानवी संस्कृतीचं ध्येय आहे. तो एक असा 'युटोपिया' आहे. ज्याकडे वाटचाल करणं हे मानवी संस्कृतीच्या विकासाची खूण आहे. माणूस तसा शंभर टक्के आहे का? नाही, पण बऱ्याच प्रसंगी तसा वागतो. सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान प्राण का देतात? कुष्ठरोग्यासाठी बाबा आमटे जीवन का वेचतात? हे सारे आदर्श आहेत. उद्या बाबा आमट्यांवर कुणी कादंबरी लिहिली तर ती आदर्शवादीच असणार. तिला का अतिरंजित कलात्मक म्हणायची?
 तर मला सांगायचं आहे की, साहित्यात व्यासदृष्टी व वाल्मीकीदृष्टी दोन्हींना स्थान आहे, असावं. त्यामुळे अकारण कलात्मक विश्वासार्हतेचं स्तोम माजवीत केवळ व्यासदृष्टी साहित्यात श्रेष्ठ व वाल्मीकीदृष्टी कमी प्रतीची मानायचं कारण नाही. मराठी समीक्षकांची समीक्षा बऱ्याच प्रमाणात वाल्मीकीदृष्टी नाकारते याचा मला खेद वाटतो. माझं लेखन व्यासदृष्टीनं वास्तव मांडीत असताना त्या जोडीनं वाल्मीकीदृष्टीनं त्यात आशावाद पेरणारं आहे, असं मी स्वत:बद्दल म्हणू शकेन.
प्रा. रूपाली शिंदे :
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही तुमची बृहदकादंबरी. त्यासाठी आपण केलेले मनन, चिंतन व अभ्यासाबद्दल थोडं सांगावं. मराठी साहित्यिक अभ्यास-चिंतनाच्या बाबतीत कमी पडतात. 'प्रतिभावंत' असणं हे कारण आहे का? त्याचबरोबर वाचनचिंतन-लेखन-पुनर्लेखन याची तुमची काय पद्धत आहे हे जाणून घ्यायला आम्हांला आवडेल.
लक्ष्मीकांत देशमुख :

 आपण एकाच प्रश्नात अनेक उपप्रश्न विचारले आहेत; पण त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल. प्रथम मी तुमच्या या निरीक्षणाशी सहमत आहे की, मराठीमधले लेखक अभ्यास - चिंतनाबाबत कमी पडतात. त्याचे कारण 'प्रतिभावंत' असणे हे आहे का? हा फार मार्मिक प्रश्न आहे. तुम्ही हे वचन- कोटेशन- जाणता की, प्रतिभा एक टक्के असते (सुचणे) व नळ्याण्णव टक्के परिश्रम असतात. टक्केवारी जाऊ द्या, पण केवळ नवं काही सुचलं पण अभ्यास-चिंतन नसेल तर कलाकृती मोठ्या होत नाहीत. स्वानुभव आणि सार्वत्रिक अनुभवावर लिहिण्याबाबत अभ्यासाची कदाचित गरज नसेल. पण जेव्हा आपण मोठा विषय घेतो, त्याचा आवाका कुटुंब व स्वत:चा सीमित भवतालापलीकडचा असतो, तो जेव्हा गांव-प्रांत-देशाच्या सीमा ओलांडणारा असतो, तेव्हा अभ्यास तर लागतोच. आपण नेहमीच वाचतो की परदेशातील लेखक

अन्वयार्थ □ ३२३