पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/327

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रा. रूपाली शिंदे :
 सर्वसामान्य माणूस सर्व प्रकारच्या संस्कारामधून आणि समस्यांमधून वाट काढीत जगत राहातो; टिकून रहातो. अफगाणी माणसाबाबतही हे दिसतं का? तिथला सामान्य माणूस दहशतवाद कसा पचवितो, गिळून टाकतो?
लक्ष्मीकांत देशमुख :
 प्रत्येक देशाची दहशतवादाशी सामना करण्याची क्षमता भिन्न असते. कारण तेथला धर्म, संस्कृती, संस्था यांच्या क्षमतेमध्ये फरक असतो. अफगाणिस्थानचा सामान्य माणूसही त्याचा चिवट धर्मश्रद्धा आणि लढाऊ, विजिगीषू वृत्तीच्या बळावर टिकून आहे. १९७९ पासून तो रक्तरंजित संघर्षाचा सामना करीत जगत आहे. आणि त्यातून सामुदायिक मन हे अधिक उदार होत आहे असं माझं निरीक्षण आहे. गेली दहा वर्षे अफगाणिस्थानमध्ये हमीद करजाईनं लोकशाही टिकवली व आता मतपेटीतून सत्तांतर झालं आहे. पण अमेरिकेच्या माघारी जाण्यानंतर काय होणार हा खरा प्रश्न आहे! अफगाणिस्थानची जनता दहशतवादाला कंटाळली आहे हे तर खरंच, पण तो संपणं हे त्यांच्या हाती नाही. कारण तालीबानचं शस्त्रसज्ज असणं व इस्लामिक राजवट आणण्यासाठी असणारं त्यांचं कडवं कडवटपण जोवर कायम आहे व त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरातून साथ मिळत आहे, तोवर दहशतवाद संपणं कठीण आहे. त्यामुळे सामान्य माणसांना काही वस्तुस्थिती स्वीकारून जगणं भाग आहे. लेखक म्हणून ही अफगाणी मानसिकता मला समजून घेणं इंटरेस्टिंग वाटतं. जगण्याचं बळ कसं मिळवायचं हा त्यांच्यापुढचा सर्वात मोठा सवाल आहे. घातपात, दहशतवादामुळे कोण केव्हा मरेल हे माहीत नाही, त्यामुळे ते दैववादी- फॅटॅलिस्टिक बनत धर्माकडे अधिक झुकू शकतात आणि दहशतवाद- संघर्ष कमी होण्याऐवजी वाढू शकण्याचीनजीकच्या भविष्यात तरी अशी भीती वाटते.
प्रा. रूपाली शिंदे :
 जगाच्या बाजारपेठांच्या सीमारेषा संपुष्टात येणे, तंत्रज्ञानातील संवाद-संपर्कक्रांती यांचा परिणाम, आपली 'ओळख' टिकवून ठेवणे त्यासाठी कर्मठपणा (धार्मिक) अंगीकारणं अफगाणिस्थानचा विचार करता गरजेचे वाटत असेल का त्या नागरिकांना?
लक्ष्मीकांत देशमुख :

 या प्रश्नाची गुंतागुंत प्रचंड आहे. हा खरं तर सर्वच इस्लामी देशांच्या संदर्भात प्रश्न प्रस्तुत ठरतो असं मला वाटतं. आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञान, संवाद-संपर्क माध्यमानं माणूस उदार मानवतावादी बनतो असं होत नाही. उलट त्यामुळे धार्मिक

३२८ □ अन्वयार्थ