पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/338

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुलाम करणे आदी विषयावर पात्रांकरवी विस्तृत असं जीवनदर्शन आलं आहे. बालमजुरी हे शोषणाचं सर्वात वाईट व काळं रूप आणि विकृती आहे हे माझ्या 'हरवलेले बालपण' मध्ये अधोरेखित झालं आहे. याची तुमच्यासारख्या समीक्षक अभ्यासकांनी दखल घेत विवेचन केलं आहे. केवळ कलावादी- सौंदर्यवादी फूटपट्या लावीत त्याकडे कानाडोळा करणं योग्य नाही.
 एकूण मराठी साहित्यात जागतिकीकरणाबाबत व प्रभावित केलेल्या संस्कृतीजीवन व्यवहाराबद्दल किती आलं आहे, हे सांगण्याइतपत माझा अभ्यास नाही. तथापी राजन गवस, रंगनाथ पठारे, राजन खान आदींच्या साहित्यातून काही प्रमाणात तरी हे आलं आहे असं माझं मत आहे.
विनोद शिरसाठ :
 साहित्यविषयक आकलन आणि लेखन या संदर्भात तुमच्या कारकिर्दीचे काही टप्पे दाखवता येतील का? असे टप्पे येण्यास कारणीभूत ठरलेले घटक कोणते असावेत? अद्याप साहित्य व समाजाच्या आकलनाचे काही टप्पे बाकी आहेत असे आपणास वाटते का?
लक्ष्मीकांत देशमुख :
 (हसत) बापरे, हा तर फारच समीक्षकी थाटाचा प्रश्न झाला. दुर्दैवाने मी काही मराठीचा प्राध्यापक नाही. असो, विनोदाचा भाग सोडून देऊ या; पण खरंच हा प्रश्न भलताच अवघड आहे माझ्यासाठी. पण तरीही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
 एक बाब मात्र इथं नमूद करणं आवश्यक वाटतं की, मी उस्फूर्ततेवर भर देत लिहिणारा ललित लेखक आहे. मला एकादी कथा सुचली की, सुरुवात करताना जो वेळ लागेल तो दिला, की सलग एक-दोन वा तीन बैठकीत १५ ते २५ फुलस्केप पानांची कथा लिहून होते. माझ्याकडून त्यासाठी फार चिंतन, मनात ती घोळवत राहाणं असं होत नाही. दिवसभर व झोपेतही आपला मेंदू काम करीत असतो, त्या अर्थानं विचारचक्र चालू असतंच. त्या विचारचक्रात इतर सांसारिक बाबींप्रमाणे कथेचा विचारही असतो. पण उस्फूर्ततेवर माझा जास्त भर असतो. हीच बाब कादंबरी लेखनाची आहे. ती दीर्घ टप्प्याची असल्यामुळे तिथं प्रत्येक टप्प्यावर व प्रकरण/ भागापूर्वी चिंतन होणं अपरिहार्य आहे. पण मी सहजतेनं लिहितो, त्याचे पुनर्लेखनपूर्ण नवा ड्राफ्ट होत नाही. थोड्या दुरुस्त्या, थोडीशी भर वा थोडीशी काटछाट होते. अगदीच एकादा भाग पसंत पडलाच नाही तर नव्यानं लिहून होतं एवढंच.

 या पाश्र्वभूमीवर माझे साहित्यविषयक आकलन व लेखनाचे काही टप्पे दिसतात का? माझं वाचन अफाट आहे. मी नेहमी म्हणतो, वाचकाचा प्रवास (मराठीच्या

अन्वयार्थ □ ३३९