पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/355

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाची कलाकृती आहे. आपले म्हणणे वाचकांपर्यंत त्याद्वारे पोचवण्यात आपण यशस्वी झालात का? या कादंबरीत आपण कोणत्या पात्राद्वारे व्यक्त झाला आहात?
देशमुख -
 हा प्रश्न फारच व्यापक आहे, पण त्याचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तुम्हांस व अनेकांना हे खुळेपणाचं वाटेल, पण मला टॉलस्टॉयच्या 'वॉर अँड पीस' च्या तोडीची नव्हे (ते शक्य नाही हे मी जाणतो), पण त्या जातकुळीची खरी - खुरी जागतिक म्हणता येईल अशी कादंबरी लिहायची होती. त्यासाठी धर्म व दहशतवादाच्या मिश्रणातून साकारलेला अतिरेकी धर्मवाद व मूलतत्त्ववाद आणि इतिहासाचे काटे उलटे फिरविण्याचा खुळा पण जिद्दीचा प्रयत्न - यामुळे एक देश अक्षरश: कसा बरबाद होतो हे मी या कादंबरीद्वारे रेखाटलं आहे. अफगाणिस्थानमध्ये पुरोगामी डावी विचारसरणी १९७९ मध्ये सत्तेवर आल्यावर धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी धर्माच्या नावाने जिहाद करीत ती कशी पराभूत केली व देशाला पुन्हा कसं मध्ययुगात ढकललं...... हे मानवतेसाठी किती भयंकर आहे, विचार करायला लावणारं आहे व जगाच्या भवितव्यासाठी ती धोक्याची घंटा कशी आहे, हे सांगण्यासाठी ही बृहद् कादंबरी मी लिहिली. मराठीतच काय, भारतात अशा प्रकारची तात्त्विक लढाई चितारणारी व त्याच वेळी सामान्य माणसांच्या भीषण रक्तलांछित लढ्यामुळे झालेल्या शोकांतिकेची गाथा कुणी लिहिली नसेल, असा मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून आणि 'आपुली आपण करी जो स्तुती तो एक मूर्ख' या उक्तीप्रमाणे मूर्खपणाचा लावला जाणारा शिक्का सहन करूनही म्हणेन. पण चंद्रकांत बांदिवडेकर, अनंत मनोहर, अभिजित वैद्य, प्रल्हाद वडेर, शंकर सारडा व विश्राम गुप्ते सारखे मोजके समीक्षक वगळता माझ्या या कादंबरीची समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही, याचा मला खेद व खंत आहे. पण मी त्याबाबत काय करू शकतो? पण चोखंदळ वाचकांनी दाद व पसंती फार उत्साहवर्धक होती. असो.
 डावी, उजवी व दोन्हीचा सुवर्णमध्य साधणारी उदारमतवादी पुरोगामी लोकशाही विचारधारा अशा तीन प्रवाहाचा संघर्ष तीन पात्रांमार्फत व त्यांच्या जीवनप्रवासातून 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' मध्ये मी मांडला आहे. त्या पैकी मी पुरोगामी उदारमतवादी इलियासच्या पात्रातून वैचारिक स्वरूपात व्यक्त झालो आहे असं मला वाटतं.
परसावळे -

 कलात्मक अभिव्यक्ती व रुळलेल्या तंत्रापेक्षा मानवी मूल्यांचे संप्रेषण आपणास अधिक महत्त्वाचे वाटते असे माझे निरीक्षण आहे. तसेच तुमच्या प्रभावी परखड ध्येयवादी आशयापुढे तुमचे समीक्षकही सूचक स्तंभित झालेले दिसतात. यावर तुमची

३५६ □ अन्वयार्थ