पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच्या पाठीशी अधिक लागतो. 'सृजन कसा तडफड करी' ही कथा अशाच एका मनस्वी कलावंताच्या असीम द:खाचा वेध घेते. गुरू व रीटा या चित्रपट क्षेत्रातील दोन कलावंतांची ही शोकात्म कथा. प्रत्यक्षातील गुरुदत्तच्या लौकिक जीवनातील संदर्भाचे स्मरण करून देणारी व या संग्रहातील महत्त्वाची ठरावी अशी कथा. गुरू हा एक कलात्म ध्यास असलेला दिग्दर्शक, मात्र सतत अस्वस्थ. सतत नवे काही शोधण्याची, निर्मिण्याची धडपड. आपल्याच विश्वात, कलाजीवनात मग्न; त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष, पत्नीशी सतत संघर्ष. मुलगी पत्नीने त्याच्यापासून दूर ठेवलेली त्यामुळे दु:खाची खोलवर टोचणी. दुसरीकडे या कथेतील नायिका व गुरूच्या चित्रपटाची नायिका रीटा हिचा कुटुंबव्यवस्थेवर विश्वास नाही. एका मित्राबरोबर आलेल्या संबंधातून लग्नाअगोदर मुलगा होतो, त्याला वाढवते. मात्र तो फार काळ टिकत नाही. त्याचे जीवघेणे दुःख आयुष्यभर सांभाळते. या दोघांची मैत्री, एकत्र येणे, निर्मितीच्या जीवघेण्या वेणा, सामाजिक घटकांचा जाच, कौटुंबिक विस्कटलेपण, सततची अस्वस्थता, भणंगता अशा विविध ताणांवर तोललेली ही कथा एका आदिम सत्याचा शोध घेऊ पाहते. मानवी जीवनाकडून आधिभौतिकतेकडे झेपावू पाहाते. या निमित्ताने कथेत कुटुंब, विवाह या संस्थांच्या मर्यादा आणि आवश्यकतेचा परीघ यांकडे देखील अंगुलीनिर्देश केला गेला आहे. या संग्रहातील व देशमुखांच्या कथासंभारातील एक महत्त्वाची कथा म्हणून तिचा उल्लेख करता येईल. 'जोकर' ही कथा 'मेरा नाम जोकर' या चित्रपटाशी नाते सांगणारी, शारीर अपंगत्वामुळे जोकरच्या वाट्याला येणारे प्रेम- वैफल्य चित्रित करणारी अशी आहे.
 'किलिंग' या कथेत देखील कलांवत लेखकांचा जीवनानुभव आणि तो प्रकट करत असताना होणारी जीवघेणी घालमेल प्रकटते. कथेची नायिका प्रियू ही बालकांसाठी कथालेखन करते. तिचा मुलगा बंडू हा मतिमंद आहे. सतरा वर्षांचा असूनही त्याची नीट / पुरेशी बौद्धिक वाढ झालेली नाही. त्याला इतके दिवस महत्प्रयासाने वाढवले. अजून बरेच आयुष्य पडले. मात्र मातृत्वाची ओढ तिला स्वस्थ बसू देत नाही. त्याच्या रंजनासाठी, रिझवण्यासाठी विविध उपाय करते. त्याचाच भाग म्हणजे बंडूसाठी कथालेखन करणे. या कथेत ती नंदू नावाचा शूर, धाडसी असा बालनायक निर्माण करते. बंडूच्या अपंगत्वाची उणीव नंदूच्या निमित्ताने भरून काढते. नंदूच्या पराक्रमाच्या कथामालिका बालवाचकांना देखील प्रिय वाटतात. नंदला यशाच्या शिखरावर नेऊन बसवते. मात्र इकडे बंडूला आजारपणामुळे सांभाळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे; तेव्हा त्याला 'मर्सी किलिंग' द्यावे की काय असा विचार विद्युत्वेगाने तिच्या मनात चमकून जातो. मात्र तिच्यातील आईपण तो लागलीच धुत्कारून लावते आणि ती बंडूच्या जगण्याच्या बाजूने

५२  अन्वयार्थ