पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असण्याची शक्यता आहे. मात्र इथे कथावस्तूमध्ये ती सातत्याने डोकावल्यामुळे त्या व्यक्तिरेखेचा 'हस्तक्षेप' वाचकांना कथारूपात बाधित करतो. उदा. “साने गुरुजी तर कोणत्याही मातेपेक्षा जास्त वत्सल, करुणामयी होते. कलेक्टरही स्त्रीपूजक आहेत. मीही माझं बाळ असंच चांगलं संस्कारित करेन.” ('ऑपरेशन जिनोसाईड' पृ. ९३) अर्थात हा तपशीलाचा भाग सोडला तर या आठ कथांनी प्रस्तुत प्रश्नांचा विविधांगांनी वेध घेऊन त्याची तीव्रता समाजमनासमोर अधोरेखित केली आहे.
 देशमुखांच्या या संग्रहातील आणि अगोदरच्या दोन्ही संग्रहातील कथा विशिष्ट विषयाला 'लक्ष्य' करून, त्या सूत्रांची नीट मांडणी करून आलेल्या असल्यामुळे त्या त्या विषयाची खोली, त्याचे विविध अंत:स्तर त्यातून प्रकटतात. त्यामुळे विषयाचा व्यापक पट तर उभा राहतोच; परंतु सलगतेमुळे कादंबरी सदृश्यतेचा प्रत्यय येतो.
 देशमुखांच्या या कथा अभ्यासल्यानंतर लक्षात येते की, ते 'कथा' हा वाङ्मयप्रकार आणि समाजजीवनातील प्रश्न या दोहोंनाही नीट समजून घेऊन वृत्तिगांभीर्याने लेखन करतात. अनेक कथांतून येणारे निवेदक, काही व्यक्तिरेखा ह्या कथाकार देशमुखांशी तुलनीय ठरतात. तसेच काही कथांतून त्यांनी केलेले निवेदनाचे प्रयोग आणि नव्या 'गाव विकणे आहे' या कथेतील विषयाची मांडणी पाहाता कथा प्रकाराच्या शक्यता ते नीट समजून घेताहेत असे दिसून येते.
 देशमुखांची ही कथासूत्रे पाहिल्यानंतर जाणवते की, ते महाराष्ट्रीय समजमनाची दुखरी नस पकडू पाहतात. आणि एवढेच करून थांबत नाहीत तर त्या दुःखावर इलाज देखील शोधण्याचा प्रयत्न करतात. या कथा 'कथा' म्हणून तर मराठी वाचकांच्या स्मरणात राहतीलच; परंतु त्यापेक्षा सामाजिक आशयसूत्रांना जोरकसपणे 'पॉईंट आऊट' करणाऱ्या आणि 'आऊट ऑफ बॉक्स' विषय मांडणाऱ्या म्हणून निश्चितच वाचकांच्या चांगल्या स्मरणात राहतील.




अन्वयार्थ ६१