पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/67

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चिंतनशीलतेचे हे परिमाण वाङ्मयातील त्यांच्या विदग्ध वृत्तीचे परिचायक आहे हे निश्चित!
 'नंबर वन' हा क्रीडाविश्वाचे अंतर्बाह्य दर्शन घडवणारा संग्रह, सामान्य वाचकांसाठी अनुभवांचे अनवट दालन प्रस्तुत करताना दिसतो. देशमुखांच्या लेखनात गोचर होणारे व या संग्रहात प्रकर्षाने जाणवणारे त्यांचे वैशिष्ट्य हे, की ते सातत्याने दुर्बल - दलित - पीडित व उपेक्षितांच्या बाजूने उभे राहताना दिसतात.
 बॉर्न फायटर आणि फायटिंग स्पिरिट व पॉझिटिव्ह लाईफ अॅटिट्यूड असलेल्या शांतारामचा पाय कापावा लागल्यानंतरही तेवढाच दिलदार, उत्साही व कार्यतत्पर म्हणून शेष जीवनात राहू शकतो याचं देशमुखांनी अतिशय प्रेरणादायी वर्णन केलं आहे. कथेत अंध, मूकबधिर, मतिमंद इ. अपंग मुलांच्या आयोजित केलेल्या चाचण्यांच्या निमित्ताने त्यांच्या मुक्त आनंदी लीलांची केलेली वर्णनं लेखकाच्या हळव्या, प्रेमळ व निर्मळ मनाचा प्रत्यय देणारी आहेत. (रियल हिरो)
 अपंग हिरोच्या कथेनंतर दुसरी कथा (फिरूनी नवी जन्मेन मी) पाथरवट जमातीच्या मीनाची आहे. देशमुखांनी हे प्रमुख पात्र एखाद्या राऊंड स्कल्पचरसारखं सर्व बाजूंनी मन:पूर्वक घडवलं आहे. कथेचं स्वरूप काहीसं अवघड, गुंतागुंतीचं असून संरचनेच्या दृष्टीनं लेखकाला कसाला लावणारं आहे. मीनाला वयात येऊनही पाळी येत नाही. ती स्वभावानं आक्रमक; ओठावर अधिक लव असलेली, उंच व टोनड बॉडीमुळं व्यक्तिमत्त्वात पुरुषी झाक असलेली. तनूसोबत लेस्बियन कपल म्हणून राहिलेली, आणि किशोरशी शरीरसंग केलेली असं तिचं व्यामिश्र व्यक्तिमत्त्व आहे. पुढे जेंडर टेस्टमध्ये तिला मुलींच्या स्पर्धेत नाकारण्यात येतं. आणि तिच्या दयनीय अवस्थेची कहाणी सुरू होते व ती निराश होऊन जीवन संपवू पाहते. तिला त्या व्यूहातून बाहेर काढण्याचा अॅड. मंजुळा भाभी प्रयत्न करतात. अंतत: मीनाला स्वत: स्त्री असल्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो.
 'शार्पशूटर' ही अदभुतरम्य व कल्पित वाटावी अशी कथा. हिंदू आणि मुसलमान अशी दोन पात्रं धर्मातीत होऊन मनोमीलनाचा सद्गदित करणारा एक उदात्त अनुभव घेऊ शकतात, याचं एक छान चित्र इथं साकार झालं आहे.
 'बंद लिफ्ट' मध्ये लेखक पुन्हा विनोद कांबळीच्या पाठीमागे उभा आहे. कथेत त्याचं नाव हॅम असलं आणि तेंडुलकरचं सॅम, तरी या उभय मित्रांचं वर्णन त्यांना अवगुंठित करू शकत नाही. दलित असल्यामुळं आपली उपेक्षा झाली असं हॅमला सतत वाटत आलं आहे. प्रत्येक घटनेचा शोध तो दलित अंगाने घेतो.
 कथेतील संवादात प्रसंगानुरूप लेखकानं मुद्दाम पेरलेली पुढील काही वाक्यं आज पुन्हा विचार करायला लावणारी आहेत.

६८ अन्वयार्थ