पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्पण पत्रिकेत छापला आहे. तो कथासूत्राचा मुख्य दोर बळकट करणारा आहे.
 या संग्रहाला "स्त्री भ्रूणहत्या प्रश्नाचा परिणामकारक दस्तऐवज" ही समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या जाणकार समीक्षक पुष्पा भावे यांची प्रस्तावना जोडली आहे. त्या शेवटी महत्त्वाचा अभिप्राय नोंदवितात.

  कथासंग्रह प्रत्यक्ष अनुभवावर रोवलेला असला तरी कथात 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमाचा वा जिल्हाधिकाऱ्यांचा उल्लेख असावा का? असा प्रश्न उपस्थित होतो. 'सेव्ह द बेबी गर्ल' या उपक्रमासाठी आणि त्या उपक्रमाचाच ललित दस्तऐवज असणाऱ्या कथांसाठी मराठी वाचक देशमुखांचे आभार मानतील. महत्त्वाच्या विषयावरच्या या पुस्तकाचे परिशिष्टही प्रस्तुत आणि वाचनीय आहे.
 त्यांच्या 'दस्तऐवज' या विशेष नामकरणामुळे अनिल अवचटांच्या सामाजिक कार्यातून जन्मलेल्या 'माणसं' प्रमाणेच 'विकास प्रशासना'च्या ध्यासातून जन्मलेल्या 'रिपोर्ताज'च्या वळणाच्या ह्या कथा आहेत असेही म्हणता येईल. उदा. 'नारूवाडी' हा प्रांताधिकाऱ्याचा संवेदनशील प्रशासकीय अहवालच आहे. पंधरा वर्षापूर्वी इराची वाडी या मराठवाड्यातील दुष्काळी गावात पाणी नळ योजना व रस्ता करून दिला होता. ते आय. ए. एस. होऊन कलेक्टर आल्यानंतर गाव जेथे होते तेथेच दिसते. जुन्या विहिरीचे प्रदूषित पाणी व्यायल्याने प्रत्येकाला घरोघर नारू झालेला असतो. राजकारणात नळ योजना शेजारचे केरगाव बंद पाडते. हे प्रखर वास्तव 'विकास' या संकल्पनेचीच खिल्ली उडवते.

 शीर्षकामुळे ‘पाणी चोर' घटनाप्रधान चातुर्य कथा वाटते, परंतु एका तालुक्यातील पाणी दुसऱ्या तालुक्यातील जमीनदार व राजकारणी चोरांनी अडवल्यामुळे दुष्काळात शेतीच बुडालेला महादू साखर कारखान्यात ऊस तोडायला मजूर म्हणून सहकुटुंब येतो. त्याने चहा नाकारणे एवढीच साधी घटना ‘सटायर' चे रूप घेते. 'लढवय्या' मधील महादू कांबळेला सैनिक म्हणून सरपंच दाजीबा पाटलांची लॅन्ड सीलिंगमधील जादा पाच एकर जमीन दिली जाते. तो ती कष्टाने करतो. परंतु दोनच वर्षात ती पाझर तलावासाठी ताब्यात घेण्याचे डावपेच खेळले जातात. त्याच्यावर गाव बहिष्कार टाकते. 'सामना' च्या वळणाची ही कथा प्रचारकी वळणावर जाण्याचा धोका लेखकाने कौशल्याने टाळला आहे. मी सध्या भारतीय साहित्यिकांचे व साहित्याचे जातीयीकरण आणि सौंदर्यशास्त्र या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठ प्रकाशनासाठी ग्रंथ लिहीत आहे. या संदर्भात देशमुखांची स्वानुभव चित्रित करण्यातील तटस्थता पु. भा. भावेंच्या तुलनेत अत्यंत निकोप वाटते. मात्र ते जेव्हा जात -

७४ □ अन्वयार्थ