पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/85

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. अस्पष्ट असले तरी मुख्य पात्राचे लोकेशन खेड्यात - तालुक्याच्या ठिकाणी दाखवले आहे. खबरीलालची पत्नी या रॅकेटला पकडण्यात अग्रभागी असते. शेवटी मोर्चात ती आक्रमक भाषण करते. हा भाग प्रचारसभेचे रूप धारण करतो. भिन्न पात्रांना प्रसंगांचे कोलाज करीत कथेचा गोफ गुंफायला लावला आहे. हे तंत्र पूर्वी कादंबऱ्यात होते. मात्र 'केस स्टडीज'मध्ये भिन्न नमुन्यांचे वेगळे कोलाज येते. ते उत्तराधुनिक तंत्रात बसणारे आहे. पण प्रसंग 'कन्ड्राइव्हड्' वाटण्याची अडचण आहेच. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी'मध्ये पाडलेल्या मृत अर्भकालाच बोलते केले आहे. त्यामुळे एडवर्ड सईद ज्याला इहलौकिकता (worldliness) आणि संदर्भाचे जाळे (affiliation) म्हणतो त्याला या कथेत स्थान उरत नाही. निवेदक मृतात्मा अर्भकाच्या प्रौढ भाषेवर वाचकाला विश्वास ठेवावा लागतो. ही एक कॉमेडीच बनत जाते. मात्र त्यातील खालील प्रकारची विधाने लेखक अर्भकाकडून वदवून घेत आहे असे वाटत राहते :
 आज मी मानते निर्मिकाला. तो सांगणाऱ्या सत्यशोधक जोतिबा फुल्यांना आणि जगन्माता सावित्रीला. जोतिबाच्या पितृत्वातून मला 'सावित्रीची लेक' व्हायला आवडेल... (११५)
 'सर्मना' सारख्या या पत्र कथेचा शेवट पाहा :
 एक विनंती करू ममी, हे पत्र तू जसंच्या तसं कथा म्हणून कुठेतरी छापून आण. या कथेला शीर्षकही मीच सुचवते 'सावित्रीच्या गर्भात मेलेल्या लेकी.' मी स्वत:हून मेले हे वाच्यार्थानं खरंच. पण मला 'मुलगी नकोच नको' या पुरुषी मनोवृत्तीनं मारलंय हे व्यापक अर्थानं अधिक खरं आहे. ही कथा वाचून काही पुरुषांच्या डोळ्यात अंजन पडलं तरी माझ्या न जगलेल्या जन्माचं सार्थक होईल! करशील ना एवढं माझ्यासाठी? प्लीज?
 हरि नारायण आपटे व श्री. म. माटे यांच्या काळात कथेच्या शेवटी 'वाचक हो थांबा, या कथेचा बोध काय?' तो थोडक्यात 'तात्पर्य' म्हणून मांडत. इसापच्या नीतिकथापासून ही प्रथा चालत आली होती. परंतु इंग्रजाळलेल्या लघुसंस्कृतीत तो तात्पर्याचा तुकडा नाटकातल्या नांदीप्रमाणे छाटला गेला. उत्तराधुनिक तंत्रात त्याचे पुनरागमन अटळ आहे. मात्र कथाकाराची जागाच समाजसुधारक लोकशिक्षणाच्या तळमळीने बळकावू लागला तर श्रीमती भावेंनी सूचित केलेला पेच उभा राहील.

 येथवर या तीन संग्रहांच्या केलेल्या चर्चेवरून आशय आधारित कथांच्या गुच्छात आढळलेल्या बलस्थानांची व मर्यादांची कल्पना आली असेल. ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या 'उदक'मधील कथांची तुलना मढेकरांच्या 'तांबडी माती' व 'पाणी'शी

८६ □ अन्वयार्थ