पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
॥३॥

'नंबर वन' या कथासंग्रहातील कथांमध्येही कणखर बाण्याच्या महिला खेळाडूंच्या विश्वाचे अनोखे रेखाटन प्रकट झाले आहे. यामधील स्त्रीरूपे ही प्रेरक - प्रेरणादायी ठरणारी आहेत. 'प्रयासे जिंकी मना' मधील ममा ही बालपण कोकणच्या समुद्रकिनारी गेल्यामुळे माशाप्रमाणे सहजगत्या पोहणारी, बटरफ्लाय व बॅक स्ट्रोकमधील दोन सुवर्णपदके ऐंशीच्या दशकात पटकावणारी मानिनी स्त्री आहे. तितकीच ती भावनाशीलही आहे. कारण ती जयवंत या मुलाला पाण्यापासून बाजूला ठेवू पाहते. परंतु जयवंत तिच्या मताविरुद्ध वागतो व पोहायला शिकतो. तिचे अजित (मुलगा) व दिलीप (नवरा) हे दोघे पाण्याचा बळी ठरल्याने तिच्या मनातील भीती ही बळावलेली असते. त्यामुळे ती भीती रास्त होती. पण जय गोहाटीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करतो. घरी येतो व आईच्या गळ्यात ते पदक घालतो. आई पुन्हा त्याच्या गळ्यात ते पदक घालते. इथे कोण जिंकले? हा प्रश्न येतो. तर दोघेही जिंकले गेले. मानवी भयगंडाचा आणि स्त्रीच्या औदार्याचा रूपशोध उकलण्याचा प्रयत्न या कथेत आढळतो. क्रिकेट, टेनिस, स्वीमिंग, इनिंग या स्पर्धांमधल्या महिलाविश्वाला साजेसे रूप देण्याचा त्यांचा प्रयत्न भारतीय स्त्रीरूपाचे दुसरे अंगही उलगडून दाखवतो. या महिला बाहेर स्वैर वागतात याचाही निर्देश त्यांच्या कथांमधून आढळतो. उपभोगाच्या पातळीवर आढळणारी लवचीक आवाहनं अनुबोधात्मक ठरली आहेत हेही जाणवते. या क्रीडा जगताशी निगडित अशा स्त्रिया कुणाच्या माता, भगिनी, सहचारिणी, प्रेयसी आहेत तर कुठे तटस्थ राहणाऱ्या आहेत.

 'अखेरचं षटक' ही कथा दुहेरी भावनात्मक पेचाचा उलगडा करणारी, मोकळ्या मनोविश्वाच्या बेगमची उत्कट अवस्था दर्शविणारी आहे. तिच्या मनातले विचार हे भारतीय स्त्रीच्या वेगळ्या नात्याचे व्यक्त होणारे विचार वाटतात. स्त्रियांना दोन पती करण्याची चाल जर असती तर....' दोन भिन्न भिन्न पुरुष सलीम (पती) व संतोष (प्रियकर) हे वेगवेगळ्या बाजूला दोन्हीकडे दोघे राहिले असते हा विचारही तिच्या मनात चमकून जातो. स्त्रीच्या मनातील पुरुषाची प्रतिमा हार - जीत न होता समांतर राहते हे या कथेचे अनोखे सूत्र राहिले आहे. एक तिचा प्रियकर आहे व एक तिचा पती आहे हे नाते तिने अधिक कोमलरीत्या जपले आहे. याच्या उलट 'ब्रदर फिक्सेशन' ही कथा आढळते. स्वीटी ही या कथेची नायिका. तिचा पती आणि भाऊ हे दोघेजण खेळाडू आहेत. ते एकाच टीममध्ये एकत्रच खेळत आहेत. तिचा पती मानसशास्त्राचा विद्यार्थी असणारा पण खेळाकडे ओढला गेलेला

अन्वयार्थ □ ९१