पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/131

हे पान प्रमाणित केलेले आहे.






भारतीय अर्थव्यवस्थेचे भरकटलेले गाडे


 रोमन साम्राज्यातील एक जगप्रसिद्ध कथा आहे. ज्युलिअस सीझरचा खून झाला. हत्येच्या कटाचा प्रमुख सीझरचाच एक सरदार मित्र ब्रुटस. ज्युलिअर लोकशाही संपवून स्वतः सर्वाधिकारी बनू इच्छितो अशा संशयाने तो ज्युलिअस सीझरच्या दफनविधीच्या वेळी भाषण करायला उभा राहिला. ब्रुटसच्या विरुद्ध बोलणे कठीण काम होते; पण सीझरविषयीचे प्रेम आणि आदर अँटनीला स्वस्थ बसू देत नव्हते. अँटनीने भाषण चालू केले,
 "मी सीझरच्या दफनविधीसाठी आलो आहे. त्याची स्तुती करण्याकरिता नाही." सीझरने रोमन साम्राज्याकरिता केलेल्या एकेका कामगिरीचे वर्णन करायचे त्याच्या व्यक्तिगत गुणांची, दिलदारपणाची, लोकांवरील प्रेमाची आठवण सांगायची आणि प्रत्येक आठवणीनंतर तरीही ब्रुटस म्हणतो, की "सीझर हुकूमशहा होता आणि ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." असा प्रत्येक आठवणीचा शेवट करायचा. अँटनीच्या या भाषणामुळे रोमन नागरिकांचे डोळे उघडले आणि त्यांनी ब्रुटस आणि त्याची टोळी यांच्याविरुद्ध उठाव केला, अशी कहाणी आहे.
 लिखाणाची सांकेतिक पद्धत

 "तीन वेळा रोमन नागरिकांनी सीझरला राजमुगूट देऊ केला. तीन वेळा त्याने तो नाकारला, तरीही ब्रुटस म्हणतो, "सीझरला सम्राट व्हायचे होते आणि ब्रुटस मोठी आदरणीय व्यक्ती आहे." या शैलीचा काहीसा गमतीदार उपयोग आम्ही लहानपणी करत असू. पत्र लिहिताना जे काही खरे लिहायचे असेल ते दर ओळीआड लिहायचे आणि मधली ओळ अशी लिहायची, की त्यामुळे वाचणाऱ्यांचा गोंधळ व्हावा. एक ओळ सोडून एक ओळ वाचत गेले तर मजकूर स्पष्ट आहे. सगळे पत्र अखंड वाचले तर मात्र काहीच बोध होत नाही. असा हा सांकेतिक लिखाणाचा प्रकार.

अन्वयार्थ - एक / १३२