पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/280

हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रबोधिनी' या दोन संघटन परिवारातील संस्थाचे कार्यकर्ते पाहात होते. काँग्रेसचे कार्यकर्ते काहीसे हतबल झाले.
 गुप्त खलबते आणि ओमफस
 त्यानंतर मात्र रात्री सार्वजनिक शुचितेचे निव्वळ पुतळे असे बाळासाहेब भारदे, मोहन धारिया, उल्हास पवार, नानाभाऊ एंबडवार अशी बडी मंडळी गाड्यातून महाद्वारासमोर आली. उपोषणाला बसलेली व्यक्ती सहसा जागवरून हलत नाही. एकांतात जर जात नाहीच नाही; पण ही मंडळी अण्णांना घेऊन एका खास खोलीत 'बंदिस्त' गेली. बैठक २ तास २० मिनिटे चालली. अण्णांनी उपोषण मागे घेण्यास संमती दिली. अण्णा मंडपात आले; इतर मंडळी गाडीतून पुण्याला रवाना झाली. जाण्यापूर्वी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांना आपल्या कामगिरीची खुशखबर कळविण्यास विसरली नाहीत. सारे कार्यकर्ते निराश झाले.
 पद्मभूषणाची पगडी सलामत
 अण्णासाहेब हजारे यांनी उपोषणास सुरुवात करण्यापर्वी पुण्यातील सर्वोदय कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. त्या चर्चेत आमरण उपोषण ७-८ दिवसांनी मागे घ्यायचे असे ठरले होते; पण 'पद्मभूषण' कोणत्याही परिस्थितीत परत करायचीच अशी रणनीती ठरली होती. अण्णांनी पद्मभूषण हाती ठेवली. याचा भोवतालच्या कार्यकर्त्यांना मोठा राग आला; पण अण्णांचा हिशेब अचूक होता. पद्मभूषण शिल्लक आहे. तोपर्यंत आंदोलन केव्हाही करता येईल. राळेगण शिंदीतील पाण्याच्या प्रयोगाची झाकली मूठ जगापुढे उघडी होण्याआधी दुसरा विषय मिळाला. शिर सलामत राहिले, पगडीही राहिली. अण्णासाहेब हजारे पाण्याचा प्रश्न सोडवून भ्रष्टाचाराकडे वळले आहेत. भ्रष्टाचाऱ्यांचे आता काही खरे नाही.

(३ जून १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २८१