पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/285

हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मचारी होते." त्यांची बुडे कधी नव्हे ती सभागृहातील खुर्त्यांना लागलेली, ते प्रसंग खुशीत साजरा करण्याच्या मनस्थितीत होतेच. राव साहेब मात्र पडणाऱ्या टाळ्यांवर खुष होते. त्यांना मारून मुटकून जमा केलेल्या सभांची चांगली सवय आहे. महाविद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेत बोलत असल्याप्रमाणे अब्राहम लिंकन, इमर्सन इत्यादींची वचने थाटात उद्धृत करीत राहिले. साखर खाण्याची सवय मोडण्यासंबंधी गांधीजींची त्यांनी सांगितलेली कथा लोकांना खूप हसवून गेली. शालेय वक्तृत्व स्पर्धेतही या कथेवर हुकमी टाळ्या पडतातच पडतात.
 दोष नसे गरिबीला; दोष दरिद्री गर्वाला
 आम्ही एक गरीब देश आहोत, आमचा इतिहास मोठा आहे, भविष्यातही एक ना एक दिवस भारत वैभवाच्या शिखराला पोहोचेल; पण तोपर्यंत आम्ही मोठे आहोतच, आमचे शास्त्रज्ञ थोर, आमचे राजकीय नेते तर महाथोर असल्या आत्मवचनांनी काय साधायचे आहे? इतके दिवस देशी लोक तरी फसले आता तेही कठीण आहे. देशाची प्रगती शासनाने खुंटवली आहे, इतर नाटके, सोंगेढोंगे करण्यापेक्षा आम जनतेच्या कर्तबगारीला पूर्ण वाव देऊन सरकारी हस्तक्षेप कमी केला तर भारत इतक्या झपाट्याने प्रगती करेल, की पाच-दहा वर्षात भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेला भेट द्यावी याकरिता तिकडून आवर्जून प्रयत्न होतील आणि पंतप्रधानांच्या भाषणाच्या वेळी लुंग्यासुंग्यांना सभागृहात बसवून गर्दी जमवण्याची गरज पडणार नाही. तोपर्यंत देशातील प्रतिष्ठेसाठी परदेशी अवहेलना सहन करणे सहज टाळता येईल.

(१० जून १९९४)
■ ■

अन्वयार्थ – एक / २८६