पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/307

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विकलांग मुलांच्या बाबतीत बुद्धी-अवयव कशातच पुरेसा ताळमेळ नसतो.
 माणसारखी माणसे; पण माणूस म्हणून करायच्या सहजसिद्ध क्रियासुद्धा करण्यास असमर्थ बनलेली पाहून कीव येते आणि अंगावर काटा उभा राहतो.
 धट्टेकट्टे अपंग
 गेल्या उन्हाळ्यात दिल्लीच्या भेटीत असाच वेगळा अनुभव आला. संध्याकाळच्या वेळी गजबजलेल्या जनपथावरून जात असताना एका दुकानात काही गौरकाय माणसे आलेली लक्षात आले. त्यांना जे काही पाहिजे होते ते भाषेच्या अडचणीने त्यांना सांगता येत नव्हते. पूर्व युरोपातील परवा परवापर्यंत समाजवादी अमलाखालील एका देशतील ही प्रवासी मंडळी, त्यांची मातृभाषा किंवा रशियन दुकानदाराला समजत नव्हते. दुकानदाराचे हिंदी, इंग्रजी त्यांना कळत नव्हते. त्यांच्यापैकी एकाला थोडे फ्रेंच येत होते. त्यामुळे थोडे दुभाषाचे काम करून, मी त्यांची अडचण सोडवली. माझे आभार मानताना त्यांतील एक वयस्क पुरुष म्हणाला, "हिंदुस्थानातील उद्यमशीलतेने आम्ही मोठे चकीत झालो आहोत. इथल्या प्रत्येक दुकानात सामानाची नुसती लयलूट आहे. साध्या या खेळण्यांच्या दुकानात पाहा. दुकानातील कपाटेच नाही तर छतसुद्धा टांगून ठेवलेल्या मालाने झाकून गेले आहे. कितीतरी माल, दरवाज्याच्या बाहेर ओसंडत आहे. या एवढ्या वस्तू तयार करतो तरी कोण? याचे कारखाने कोठे आहेत? खेळणी तयार करण्याचे काम कोणत्या मंत्रालयात होते?"
 भारतीयांच्या उद्यमशीलतेची प्रशंसा?
 त्यांच्या प्रश्नांची भडिमार ऐकून मी चकित झालो, चक्रावलो आणि थोडा सुखावलोही. माझ्या देशवासीयांच्या उद्यमशीलतेचा उल्लेख मी प्रथमच ऐकला. येथील लोक तेवढे सारे आळशी, गदळ असे ऐकण्याची कानांना सवय. प्रत्यक्षातला अनुभवही बहुतांशी त्याचीच पुष्टी करणारा. परदेशी प्रवाशाच्या या बोलण्याने माझ्याच देशाचे एक फारसा बोलबाला नसलेले अंग डोळ्यासमोर आले.
 मोठमोठ्या कारखान्यांत ते सरकारी असोत की खासगी, काम कसे आरामाने, थाटात चाललेले असते. बाहेर प्रशस्त हिरवळी आणि फुलांच्या ताटव्यांनी बहरलेल्या बागा, प्रशस्त हवेशीर उजेडाच्या इमारती, त्यांत मंदगतीने चालणारा कर्मचारी वर्ग. हे दृश्य खास हिंदुस्थानी खरे; पण त्याबरोबर दुसरेही एक दृश्य तितकेच एत्द्देशीय आहे.

 लहानमोठ्या शहरांच्या गल्लीबोळात आणि झोपडपट्ट्यात पत्र्यांच्या छपराखाली चेंडू बाहुल्यापासून प्लॅस्टिकच्या विविध वस्तू, मोठमोठ्या कारखान्यांना लागणारे

अन्वयार्थ - एक / ३०८