पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/346

हे पान प्रमाणित केलेले आहे.






अन्नमंत्रालयात अतिरेकी!


 "पंजाबमधील अतिरेक्यांची पिछेहाट होते आहे. पंजाबमधील भीतीचे सावट नाहीसे होत आहे. मनात कोणतीही भीती न बाळगता आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे सहज शक्य आहे," असे प्रशस्तीपत्रक सरदार खुशवंतसिंग यांनी दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात दिले. इतर अनेकांनीही पंजाबमधील परिस्थितीबद्दल अशाच प्रकारे निदान केले आहे. "अतिरेक्यांना आता पंजाबात हालचाल करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ते आता इतर राज्यात घुसू पाहात आहेत." गेल्या आठवड्यात दोन प्रमुख अतिरेक्यांना पोलिसांनी संपवले ते लुधियाना अमृतसरला नव्हे, तर मुंबईच्या उपनगरात, टेहरी, गढवाल, उत्तर राज्यस्थान येथे गेलेल्या अतिरेक्यांनाही जवान यथावकाश शोधून काढतील याबद्दल मनात शंका नको.
 पण अतिरेकी आणखी एका फार मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागी जाऊन पोचले आहेत. तिथे ते लपून छपून वावरत नाहीत, खुलेआम मोठ्या दिमाखाने फिरतात. पत्रकारांना मुलाखती देतात. आपण जणू काही सरकारी धोरणच पुढे चालवतो आहे असे दाखवतात. पोलिसांच्या किंवा लष्कराच्या लक्षातसुद्धा येणार नाही असे षड्यंत्र अतिरेक्यांनी रचले आहे.
 अस्मिता दुखवण्याचे तंत्र

 अतिरेक्यांच्या अत्याचारांना खरी सुरुवात झाली ती १९८४ मध्ये. इंदिरा गांधींनी एशियाड खेळांच्या वेळी दिल्लीत शिखांना म्हणून येऊ द्यायचे नाही असे फर्मान काढले. त्यावेळी मी पंजाबमध्ये दौऱ्यावर होतो. दिल्लीकडे येणाऱ्या गाड्यातून सर्वसामान्य सज्जन शीख नागरिकांना, त्यांच्या बायकामुलांना, बसमधून आगगाड्यातून अगदी त्यांच्या खासगी वाहनातूनसुद्धा बंदुकीची नळी लावून उतरवत होते, त्यांची अगदी कसून तपासणी करीत होते. त्यावेळी प्रवाशांच्या

अन्वयार्थ - एक / ३४७