पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/41

हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा अलीकडचा किस्सा प्रसिद्धच आहे. समोर आलेल्या पाकिटावर शिक्का मारताना टपाल्या तरी काही तपासणी करतो तेवढासुद्धा विचार न करता, निवडणूक आयुक्त पक्षांना मान्यतेचा शिक्का देतो.
 अशा तऱ्हेने आपल्या 'अमुक सेवक' पक्षाला एकदा मान्यता मिळाली, की त्यांना चारी दिशा मोकळ्या होतील. 'अमुक सेवकांचे दिलपनाह' म्हणून एखादा पप्पूसाहेब मुंबईभर दौरे काढू लागेल, प्रत्येक सभेसाठी ही लक्षावधींची गर्दी हजर ठेवणे 'अमुक सेवक' पक्षाला काय कठीण? निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून पक्ष म्हणून मान्यता मिळवून बाहरे पडल्या पडल्या पप्पू साहेबांनी,
 "काय मूर्ख आहे हो हा निवडणूक आयोग! यांनी आम्हाला प्रतिज्ञापत्र मागितले, आम्ही दिले. आम्हाला निवडणूक चिन्ह पाहिजे होते म्हणून आम्ही खोटे प्रतिज्ञापत्र दिले. राजकारणात हे असे करायलाच लागते. आम्ही ते केले." जाहीररीत्या असे म्हटले तरीसुद्धा, पक्षपणाचे चिलखत अंगावर असल्यामुळे, पप्पूसाहेबांना आणि सेवकांना आता कोणी हात लावू शकणार नाही.
 भस्मासुराला वरदान
 एखाद्या निवडणुकीत दोन पाच खासदार आणि पाच पन्नास आमदार निवडून आणले म्हणजे तर वरदान मिळालेल्या भस्मासुरासारखे पप्पूसाहेब माजतील. गावोगाव जाऊन पत्रकारांवर, मायबहिणींवर आणि साईभक्त नसलेल्यांवर अभद्र आणि गलीच्छ शिवराळपणा करतील. आपले गुंडागिरीचे साम्राज्य पक्के करतील. पोलिस व्यवस्था ताब्यात घेतील आणि गुंडांचे साम्राज्य तयार करतील.
 गुंडांशी दोस्ती, कायद्याशी वैर
 कल्पना करा, असे झाले तर त्यावर उपाय काय? शरद पवार म्हणतात, "अशा पक्षांचा पराभव निवडणुकीतच झाला पाहिजे; पण गुंड पक्षाचा पराभव निवडणुकीनेच झाला पाहिजे, मतपेटीनेच झाला पाहिजे या लोकशाही बाण्यात निवडणुका स्वच्छ आणि मोकळ्या असल्या पाहिजेत असे गृहीत धरलेले आहे. पप्पूसाहेबांना निवडणुकीत पाडण्याकरिता पाकिस्तानी हस्तकांची मदत घ्यावी लागली तर मग लोकशाही बाणा काहीच शिल्लक राहत नाही आणि भा.ज.पा.चा पराभव करण्यासाठी गुंडांचा सहारा घेणे यातही मतपेटीवरील विश्वासी दिसत नाही. पाचदहा मतदारसंघांत फायदा मिळावा यासाठी गुंडांना तिकिटे मिळावी असा आग्रह धरणारे शरद पवार पक्षांवर बंदी आणू नये असे म्हणतात! हे काय तर्कशास्त्र आहे? गुंडांना उराशी घेणे योग्य; पण कायदा आणि घटनेच्या आधाराने घटनेशी विसंगत असणाऱ्या पक्षांना शिस्तीत आणणे

अन्वयार्थ - एक / ४२