पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/47

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जनसंघाने गोवधबंदीचा मुद्दा वर केला. जनता दलाने मंडल आयोगाचा प्रश्न असाच वापरला आणि भारतीय जनता पार्टीने अयोध्येतील मस्जिद-मंदिराचा प्रश्न उभा करून कळस चढवला. आता मंदिर बांधले, नाही बांधले, तरी जातीयतेचे भूत चिघळत राहणार आहे. सत्तेचा जादूचा दिवा हस्तगत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेली चाल देशात रक्ताचे पाट वाहवत आहे.
 आता धरबंध काहीच नाही
 अयोध्येचा प्रश्न मिटेल. कदाचित काशी, मथुरा, द्वारका हेही विषय यथावकाश निघतील. महत्त्वाची गोष्ट अशी, की अयोध्येचा वाद ना रामाच्या मंदिराचा आहे ना बाबराच्या मस्जिदीचा. सत्तेचा जादूचा दिवा हस्तगत करण्याकरिता सगळ्यांनीच काही धरबंध न ठेवता प्रयत्न केले. हिंदुत्वाची सध्या सरशी होते आहे, एवढेच. शासन सर्व अर्थव्यवस्थेचे संचालन करते. खरे म्हणजे निवडणुका या आर्थिक विचार आणि कार्यक्रम यांच्या आधारावरच झाल्या पाहिजेत; पण सत्तातुरांना भय नसते, लाज नसते आणि संयमही नसतो. जातीचे, धर्माचे नाव घेऊन शंख फुकला म्हणजे मागासलेला, आर्थिकदृष्ट्या गांजलेला, सर्वसामान्य माणूस त्याला प्रतिसाद देतो. ही युक्ती एकदा जगजाहीर झाल्यानंतर आता सत्तास्पर्धेला काही मर्यादाच राहणार नाही.
 सत्तेत वैराग्य पाहिजे
 ही स्पर्धा संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सत्ताच अनाकर्षक करून टाकणे. सरकारचा आर्थिक जगाशी काही संबंध नसला, कुठलेच लायसेन्स परमिट देणे त्यांच्या हाती नसले म्हणजे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करील कोण? सत्ता ही जबाबदारी असली म्हणजे चारित्र्यवान लोकांना सत्ता दिली जाते. सत्ता फायद्याचे कलम असले, की तेथे भामटेच येणार! आणि तेथे येण्यासाठी ते काहीही करणार. भारतातील शासनाकडून सर्व आर्थिक सूत्रे काढून घेऊन अर्थव्यवस्था खुली केली नाही तर इथली लोकशाही थोड्या दिवसांतच संपणार आहे. जर्मनीत संपली तशी आणि समाजवादी देशांत संपली तशी.

(११ फेब्रुवारी १९९३)
■ ■

अन्वयार्थ - एक / ४८