पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/106

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेला तर वर्षा- दोन वर्षांत सेऊल ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद स्वीकारण्यास पुन्हा एकदा सज्ज होऊ शकते याची त्याला खात्री पटते. मोठमोठी दुकाने सामानाने खचाखच भरली आहेत, अगदी शाळकरी मुलेसुद्धा सेल्युलर फोनवर एकमेकांशी बोलत आहेत अशा आरामाच्या जागा, सहलीची सारी उपवने माणसांनी तुडुंब भरली आहेत. दक्षिण कोरियासारख्या छोट्या देशाची राजधानी सेऊल वैभवाच्या शिखराला पोहोचली आहे व वैभवाला काही अंत नाही आणि सीमा नाही असे सारे वातावरण आहे.
 तीन वर्षांपूर्वी म्हणजे, १९९७ मध्ये दक्षिण कोरियावर आर्थिक मंदीची लाट आली होती. मोठमोठे कारखाने बंद पडले, बँकांची दिवाळी निघाली. खुल्या व्यवस्थेचा फायदा घेऊन प्रचंड वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या आशियायी वाघांपैकी दक्षिण कोरिया हा एक महत्त्वाचा देश आहे. ढाण्या वाघच जाळ्यात सापडल्यासारखे झाले.
 भारतात खुल्या व्यवस्थेला विरोध करणारे अनेक लोक आहेत. लाल बावट्याखाली सारे जग एकत्र झाले नाही आणि खुली व्यवस्था मात्र जगाला एकत्र करीत आहे याबद्दल संतापलेले जुने डावे आणि त्यांचे साथी यांनी दक्षिण कोरियातील मंदीचा मोठा गहजब केला. आम्ही सांगत होतो, बाजारपेठी व्यवस्थेमुळे कधी कोणाचे भले होणे शक्यच नाही. पटले आता? आशियायी वाघांच्या प्रगतीबद्दल मोठा डंका पिटीत होते! कशी खाशी जिरली! शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला दुसऱ्याचे शेपूट तुटलेले पाहून संतोष वाटावा असा हा प्रकार आहे. त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. हळूहळू का होई ना, आमची प्रगती चालू आहे. फार उंच पोहोचलो नाही, पण खड्डयात तर पडलो नाही ना? असेही आंबट समाधान ही मंडळी मानून घेतात.

 १९९७ साल गेले. नंतरही दोन वर्षे पार झाली. दक्षिण कोरिया झपाट्याने प्रगती करीत आहे. मागील वेळी झालेल्या चुका त्यांनी नीट समजावून घेतल्या. नवनवोन्मेषी जातिवंत शिल्पकाराला ग्राहकांची फिकीर नसते. पण, शाडूचे गणपती बनविणाऱ्या मूर्तिकाराला लवकरच स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि मंदीची लाट आऽ वासून समोर उभी राहते. तीन वर्षांपूर्वीपर्यन्त आशियायी वाघ पाश्चिमात्य औद्योगिक देशांना लागणाऱ्या फुटकळ सामानांचा पुरवठा करीत. मंदीच्या अनुभवानंतर गेल्या तीन वर्षांत या सर्व देशांनी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यावर आणि वापरण्यावर भर दिला आहे म्हणूनच त्यांची पुन्हा एकदा वैभवाच्या शिखराकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे.

अन्वयार्थ - दोन / १०८