पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/144

हे पान प्रमाणित केलेले आहे.




शेतकरी उपाशी, शेतीशास्त्रज्ञ खाई तुपाशी!


 जानेवारी २००० रोजी अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे ८८ वे अधिवेशन पुसा इन्स्टिट्यूट, दिल्ली येथे सुरू झाले. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. परोडा हे भारतीय शेती विज्ञान संशोधन केंद्राचे (ICAR) प्रमुख, जगभर त्यांच्या कर्तबगारीचा बोलबाला असलेले. देशात शेतीला काही महत्त्वाचे स्थान असो किंवा नसो, विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत मात्र शेती शास्त्रज्ञांना काहीसे झुकते मापच मिळाले आहे. गेल्या महिन्यात डॉ. परोडा यांना भ्रष्टाचारप्रकरणी पदमुक्त करण्यात आले; त्या वेळी मोठा गहजब उठला होता. जवळजवळ दोन हजार शास्त्रज्ञांनी खुद्द पंतप्रधानांकडे या कार्यवाहीबद्दल नाराजी व्यक्त करणारे निवेदन दिले. त्याहीपेक्षा कमाल म्हणजे, शंभरावर खासदारांनी डॉ. परोडा यांना सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी केली. आठदहा खासदार असलेल्या पक्षांचे नेते पंतप्रधानांना दमदाटी करतात आणि जयललिता यांच्यासारखी एखादी व्यक्तीतर सरकार खालीही आणू शकते. या हिशेबाने पाहिले तर, शंभर खासदारांचा पाठिंबा असलेले, रामनिवास मिर्धा यांचे जावई असलेले आणि काँग्रेसचे माजी शेतीमंत्री बलराम जाखड यांच्या जवळच्या नात्यातील डॉ. परोडा संशोधन केंद्रातील आपली जागा परत मिळवण्याचा हव्यास करण्यापेक्षा कृषिमंत्री किंवा पंतप्रधानच बनण्याचा प्रयत्न का करीत नाहीत, अशी हेटाळणीची चर्चाही राजधानीत चालू होती. पंतप्रधानांनी डॉ. परोडांवर कार्यवाही करण्यात मोठी हिंमत दाखवली असे कौतुकाचे स्वरही ऐकू येत होते. तेवढ्यात, डॉ. परोडा यांच्यावरील कार्यवाही मागे घेण्यात आल्याची व त्यांना त्यांच्या पदावर पुन्हा नेमण्यात आल्याची बातमी येऊन थडकली. डॉ. परोडा नियोजित विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पदच्युतीमुळे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय वैज्ञानिकांच्या भारत बदनाम होईल या धास्तीपोटी पंतप्रधानांनी आपला निर्णय फिरवला असावा

अन्वयार्थ - दोन / १४६