पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/167

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्वासित झालेले त्यांचे गावबांधव एकेका गावाच्या, तालुक्याच्या पुनर्बाधणीसाठी धावून येऊ लागले आहेत. परदेशांत निर्वासित होऊन त्यांच्याहीपेक्षा सधन झालेले त्यांचे अनिवासी भारतीय बांधव लवकरच, सरकारचा करवसुलीचा निर्णय पक्का व्हायच्या आधी येथे येऊन पोहोचलेले असतील आणि मलब्यात गाडल्या गेलेल्या आपल्या मायभूमीला नवीन रूपात साकार करण्याच्या कामाला मोठ्या आत्मीयतेने, निष्ठेने आणि भक्तिभावाने लागलेले असतील. नवीन बांधणी करताना ती अगदी सर्वोत्कृष्ट असावी असा त्यांचा आग्रह असणार आहे. त्यांच्या या उपक्रमाने देशाची अर्थव्यवस्था बिघडणार नाही, उलट, मजबूत होणार आहे. परकीय चलन देशात येणार आहे; एवढेच नव्हे तर, सिमेंट, लोखंड इत्यादी जुन्या उद्योगधंद्यांची मागणी वाढल्याने त्यांचीही भरभराट होण्याची शक्यता आहे.
 थोड्याच वर्षांत एक नवे आधुनिक सौराष्ट्र आणि कच्छ उभे राहणार आहे. देशातील सर्व राज्यांना गिरविण्याचा कित्ता वाटावा असा नवा सौराष्ट्र आणि कच्छ उदयास येणार आहे.
 एका काळी लंडन शहर गल्ल्याबोळ आणि जुनाट इमारतींनी गजबजलेले होते. रोगराई वाढत होती. इतिहासप्रसिद्ध अग्निप्रलयाने लंडन जळून खाक झाले आणि त्या राखेतून आजच्या, वास्तुशास्त्रात आदर्श मानल्या जाणाऱ्या लंडनचा उदय झाला.
 सारा गुजरातही अशीच झेप घेण्याची कुवत राखून आहे. कदाचित्, काही वर्षांनी भूकंप ही इष्टापत्ती वाटू लागेल आणि 'भूकंपापूर्वी सारे कसे गचाळ होते आणि आता नवे कसे सुंदर उभे राहिले आहे,' अशी भाषा सुरू होईल. गुजराती समाजाच्या कर्तबगारीवर पुनर्बाधणीचा प्रश्न सोपविण्यात आला तर काम झपाट्याने होईल, चांगले होईल; देशावर बोजा न पडता होईल. वर, अर्थव्यवस्थेची भरभराटही साधेल. याउलट, प्रशासनाने सारे आपल्या हाती घ्यायचे म्हटले तर अर्थव्यवस्था कमजोर होईल, पुनर्बांधणीचे कामही होणार नाही.
 फिनिक्स् पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून उड्डाण करण्याचे सामर्थ्य गुजरातमध्ये आहे. शासनाने दुराग्रह केला नाही, तर गुजरात यापुढे दगडामातीच्या मलब्यातून उठून नवे उड्डाण घेऊ शकतो; सरकारने मोकळीक दिली तर!

दि. १४/२/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / १६९