पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/202

हे पान प्रमाणित केलेले आहे.






एक दिवस असाही उगवतो


 खादा दिवस असा उगवतो आणि एखादी घटना अशी घडते, की मनात गुपचूप दडून राहणारा, एरव्ही कोणालाही न जाणवणारा अहंकार पार उन्मळून पडावा.
 ६ एप्रिल २००१ रोजी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरविण्यात आला होता. हे स्टेडियम एशियाड खेळांच्या उद्घाटनासाठी बांधण्यात आले. लाखावर प्रेक्षक आरामात बसू शकतील अशी तेथील व्यवस्था आहे. एरव्ही ती जागा सभामेळाव्यांसाठी दिली जात नाही; खेळ विभागाच्या मंत्री उमा भारती यांनी मोठ्या सौजन्याने किसान समन्वय समितीच्या 'किसान कुंभा' साठी ही जागा देण्याचे मान्य केले; एक दिवसाचे भाडे, प्रसंगानुसार साडेतीन ते साडेसहा लाख रुपये आहे, गरीब शेतकरी संघटनेच्या खिशाला परवडेल इतक्या कमी दरात ती देऊ केली. आठवडाभर आधी जाऊन पाहिले, आनंदीआनंद वाटला.
 शेतकऱ्यांचा मेळावा म्हणजे बांबू, फळ्या वापरून उभा केलेला एक मंच, लाऊड स्पीकरची जेमतेम व्यवस्था आणि समोर शक्य तितक्या साफसूफ केलेल्या मैदानावर गच्च दाटीवाटीने बसलेली, कोणत्याही गैरसोयीबद्दल 'ब्र'सुद्धा न काढणारी आणि सारे प्राण कानांत आणून एकतानतेने भाषणे ऐकणारी शेतकरी स्त्रीपुरुष मंडळी. ६ एप्रिलचा 'किसान कुंभ' असा होणार नव्हता. सर्वांना बसायला खुर्च्या, नाही तर निदान बाक मिळणार होते. एवढ्या बाबीत का होई ना, शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या संघटनेच्या परिस्थितीत फरक झाला आहे या जाणिवेने खूप बरे वाटले.

 शेतकरी संघटनेच्या मेळाव्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा उत्स्फूर्तपणा गळा दाटून आणणारा असतो. ४ एप्रिलच्या संध्याकाळीच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले 'ग्यानबा' आणि त्यांच्या 'लक्षुम्या' दिसू लागल्या. अनवाणी पाय, गाठीगाठीची

अन्वयार्थ – दोन / २०४