पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/208

हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली. इतिहासातील सर्व घटनांनी मार्क्सच्या आज्ञेप्रमाणे कवायतीसाठी उभे राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह. काही घटनाप्रसंग कवायतीत बसत नसतील तर मार्क्सवादी शब्दांचे अवडंबर माजवून काही वेगळाच घटनाक्रम ते मांडीत किंवा काही वेगळाच अन्वयार्थ सांगत. स्टॅलिनने स्वतःच जीवशास्त्र आणि उत्क्रांती यासंबंधी खोटा पुरावा उभा करून एक नव्या सिद्धांतांचे कुभांड रचले. समाजवादी नियोजनाने आपला अभ्युदय होईल ही भावना प्रत्येक देशातील प्रतिभाहीन धडाडीशून्य पराजितांना मोठी सोयीस्कर होती. एकामागून एका देशातील सत्ता कोसळत गेल्या आणि तेथे लोकांच्या लोकशाही राज्याची Peoples Democracy सरकारांची स्थापना झाली. लोकांचे सरकार म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची निरंकुश हुकूमशाही. लोकांचे सैन्य म्हणजे देशातील विरोधकांना मोडून काढणारे लष्कर. जे लोकांच्या लोकशाहीत नाही तेवढे सारे भांडवलशाही, साम्राज्यवादी रक्तपिपासू राक्षस असे व्याकरण चालू झाले.
 या सगळ्या डोलाऱ्याची आर्थिक पायाभरणीच इतकी कच्ची होती, की एक दिवस सारे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळून सपाट झाले.सोवियट युनियनचे विसर्जन झाले. संघराज्यातील राज्ये स्वतंत्र झाली. प्रत्येक राष्ट्र नियोजनाचा रस्ता सोडून खुलेपणाच्या रस्त्याने चालू लागले.

 जगाच्या इतिहासात समाजवादी साम्राज्याच्या पतनाला दुसरी तोड नाही रोमन साम्राज्य कोसळले त्याला निदान रानटी टोळ्यांच्या हल्ल्याचे निमित्त झाले. ब्रिटिश साम्राज्य कोसळले त्याला दुसरे महायुद्ध आणि वसाहतींतील उठाव कारणीभूत ठरले. रशियन साम्राज्य आपणहूनच कोसळले. एवढेच नव्हे तर सामूहिक नियोजन ही कल्पनाच बाष्कळ आहे याचा एका बाजूला गणिती सिद्धांत तयार झाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे सर्वसामान्यांच्या अंतर्मनात खुल्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेची ग्वाही रुजली.
 समाजवाद उलथला तो प्रतीक्रांतीने नाही. याचा एक परिणाम असा झाला की समाजवादाचे सारे विक्रेते आपापल्या जागी जिवंत राहिले. त्यांची सामाजिक प्रतिष्ठा गेली, राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळाली; पण समाजवादाच्या काळात त्यांनी विरोधकांचे जसे शिरकाण केले किंवा जशा शिरकाणाचे समर्थन केले तसे काहीच घडले नाही. खुल्या विचारवंतांच्या मनाला तशी कल्पनाही शिवली नाही. जुन्या समाजवाद्यांपैकी ज्यांच्याकडे काही कर्तबगारी होती ते नव्या व्यवस्थेत घुसून गेले आणि आपणच खुल्या विचाराचे आद्य समर्थक असल्याच्या आविर्भावात मिरवू लागले; पण असे थोडे बहुतेक जुने डावे पुन्हा एकदा इतिहास कलाटणी

अन्वयार्थ – दोन / २१०